विठ्ठल रुक्मिणीची मेघडंबरी चांदीने मढू लागली; 225 किलो चांदीचा वापर होणार

पंढरपूरच्या मंदिरातील गाभार्‍यात श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर बसवण्यात येणार्‍या मेघडंबरींसाठी आवश्यक असणारी दोन कोटी रुपये किमंतीची 225 किलो चांदी एका अज्ञात भक्ताने दान केली आहे. या दानशूर भक्ताने आपले नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे. चांदी मिळताच मेघडंबरी चांदीने मढविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा 17 जुलै साजरा होत आहे. त्याअनुषंगाने दर्शनासाठी पंढरीत भाविकांची गर्दी देखील वाढू लागली आहे. येत्या 4 जुलैपर्यंत चांदीने मढवलेली ही मेघडंबरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभार्‍यात बसवण्यात येणार आहे.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागामार्फत सुरू आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी काढण्यात आल्या आहेत. परंतू आता तेथील संवर्धनाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले आहे. श्री विठ्ठल गाभारा व श्री रूक्मिणी गाभारा येथील मेघडंबरी देखील नव्याने तयार करून बसविण्यात येत आहे. त्यासाठी श्रीसंत कबीर महाराज मठ व फडातर्फे कबीर महाराज मठाचे ह.भ.प.विष्णू महाराज कबीर यांनी सेवाभावी तत्वावर दोन मेघडंबरी मंदिर समितीस उपलब्ध करून दिल्या आहेत.

या दोन्ही मेघडंबरी तेजस फर्निचर पंढरपूर येथील अमोल सुतार, बाळू सुतार, पांडूरंग लोंढे या कारागीरांनी तयार केल्या आहेत. त्यासाठी देवरूख जि. रत्नागिरी येथील 3 ते 4 वर्षापूर्वीच्या सागवानी लाकडाचा वापर केला आहे. श्री विठ्ठलाच्या मेघडंबरीचे वजन 160 तर श्री रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीचे वजन 110 किलो आहे. या दोन्ही मेघडंबरीचे सुमारे 3 लाख 50 हजार इतके बाजारमुल्य आहे. मेघडंबरी तयार करण्यासाठी 35 ते 40 दिवसाचा कालावधी लागला आहे. मेघडंबरी बनविण्याचे काम मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. या दोन्ही मेघडंबरीला एका अज्ञात भाविकाने मंदिर समितीकडे संपर्क साधून मेघडंबरींसाठी लागणारी 225 किलो चांदी दान केली आहे. ही चांदी मेघडंबरीला मंदिरातच मढवून आषाढी यात्रेपूर्वी 4 जुलै रोजी गाभार्‍यात बसविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

225 किलो चांदीचे दान
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पंढरीनगरीचे महात्म्य देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी येतात व विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दरवर्षी लाखो रुपयांच्या देणगी देतात. मोलमजूरी करणार्‍य महिला भाविकापासून करोडपती भाविकांनी रोख रक्कम, सोने नाणे च्या रुपात दान दिलेले आहे. यापूर्वी जालना येथील एका भाविकाने सुमारे 3 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे मुकुट, सोन्याचा पितांबर दिलेली देणगी आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी होती. मात्र, हे दान त्यांनी दोन टप्यात दिले होते. परंतू, आता एकाच वेळी दिलेली 2 कोटींच्या किमंतीची 225 किलो चांदी मेघडंबरीसाठी दान देवून भाविकाने आपले नाव गुप्त ठेवले आहे. हे सर्वात मोठे दान असल्याचे मानले जाते.

मेघडंबरीचे वजन 495 किलो
श्री विठ्ठलाच्या लाकडी मेघडंबरीचे वजन 160 तर श्री रुक्मिणी मातेच्या मेघडंबरीचे वजन 110 किलो आहे. तर या दोन्ही मेघडंबरी 225 किलो चांदीने मढविण्याचे काम सुरु आहे. लाकुड आणि चांदी यांचे मिळून दोन्ही मेघडंबरीचे वजन हे 495 किलो असणार आहे. मेघडंबरी चांदीने मढविण्याचे काम दहा कारागिर करत आहेत.