विशेष – समर्पित साहित्यसेवा

>> विश्वास वसेकर

कोणतीही संकुचित प्रादेशिकता न बाळगता मराठी साहित्यात मौलिक योगदान देणाऱ्या मराठवाडा साहित्य परिषदेत अनेकांची वाङ्मयीन जडणघडण झाली. मराठवाडा साहित्य परिषदेचे मराठवाडा साहित्य संमेलन नुकतेच वाळूज येथे पार पडले. त्यानिमित्त या संस्थेच्या कार्याची घेतलेली ही दखल.

आमच्या मराठवाडा साहित्य परिषदेचे एक भूषणावह वैशिष्ट्य म्हणजे तिच्या नावात ‘मराठवाडा’ असले तरी तिने संकुचित प्रादेशिकता कधीच बाळगली नाही. ‘प्रतिष्ठान’ हे वाङ्मयीन मासिक सगळ्या महाराष्ट्राचे लेखन छापणारे आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार व्यापक भूमिकेतून सगळ्या महाराष्ट्रातून लेखक, कार्यकर्त्यांना निवडून दिले जातात. मराठवाडा साहित्य संमेलनात मराठवाडय़ाबाहेरच्या मोठ्या लेखकांची संख्या लक्षणीय असते. मराठवाडा साहित्य संमेलनात गो. वि. करंदीकरांनी नंतर त्याच्या ‘परंपरा आणि नवता’ या ग्रंथात घेतलेला शोधनिबंध वाचला आहे. (त्या पुस्तकातही उल्लेख आहे.) त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आजवर जेवढी महाराष्ट्र गीतं लिहिली गेली आहेत त्यांपैकी एकाही महाराष्ट्र गीतात ‘मराठवाडा’ किंवा वेरुळ अजिंठ्याच्या लेण्यांचासुद्धा उल्लेख नाही, त्याचे फार वाईट वाटून न घेता आम्ही व्यापक भूमिका घेतो.

जिचे केंद्रीय कार्यालय औरंगाबादला आहे, त्या मराठवाडा साहित्य परिषदेला मी माझी आई मानतो. माझ्या वडिलांनी क्षमता असूनही मला उच्च शिक्षणाला पैसे पाठवणे नाकारले तेव्हा म.सा.प.ने मला आश्रय दिला. 1973 साली शंभर रुपये महिना (त्याकाळचे), राहायला परिषदेची एक खोली आणि काम आवडीचे. प्रतिष्ठान मासिकाचे. दिवसभर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय आणि एम. ए. मराठीचे वर्ग करून सायंकाळी मी दोन-तीन तास म.सा.प. त नोकरी करायचो. मराठवाडा साहित्य परिषदेमुळे मी शिकू तर शकलोच, पण माझी इष्ट वाङ्मयीन जडणघडण व्हायला तिथेच प्रारंभ झाला.

1973 ते 75 या काळात परिषदेवर नितांत प्रेम असूनही परिषदेसाठी द्यायला कुणाजवळ फारसा वेळ नसे. अनंत भालेराव, भगवंत देशमुख, केशवराव देशपांडे आदी सन्मित्र कॉलनीतले हितचिंतक लांबून लांबूनच परिषदेवर प्रेम करायचे. डॉ. सुधीर रसाळ, गो.मा. पवार यांना त्यांची विद्यापीठातली नोकरी आणि स्वतचे लेखन असे. गुरुवर्य गो. मा. पवार कार्यवाह होते परंतु या काळात ते त्यांच्या प्रबंधाला अंतिम रूप देण्यात व्यग्र होते. नरहर कुरुंदकर, डॉ. जनार्दन वाघमारे असे अध्यक्ष होते. पण ते बाहेर गावचे; सटीसामासीच परिषदेत यायचे. डॉ. हरिहर ठोसर परीक्षा विभागाचे प्रमुख होते. ते माझ्या बहिणीचे दीर असल्यामुळे माझ्यासाठी सगळा आनंदी आनंद होता. या सगळ्याचा फायदा घेऊन विद्यापीठात प्रथम श्रेणीत सर्व प्रथम यायचे आणि भरपूर वाचन करायचे ही दोनच ध्येये मी डोळ्यापुढे ठेवली आणि परिणामत गाठली असेदेखील म्हणता येईल.

मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी असणारे डॉ. गो.मा. पवार, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. सुधीर रसाळ हे विद्यापीठात माझे गुरुवर्य होते. 1973 पर्यंत प्रतिष्ठान, सत्यकथा, अस्मितादर्श, मराठवाडा दिवाळी अंक यांत माझ्या कविता आल्याने कवी म्हणून माझे बऱ्यापैकी नाव झाले होते. त्यामुळे आणि मसापत नोकरी करत असल्यामुळे सर्वच गुरुवर्यांचा मी विशेष लाडका होतो. विद्यार्थी म्हणून प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचे मी शेंडेफळ! ‘छांदसी’ हे पु. शि. रेग्यांचे पुस्तक त्यांनी आम्हाला शिकवले. मोठे चैतन्यमय आणि धुंद करणारे अध्यापन असायचे त्यांचे. वा. लं. (तेव्हा यू. म. पठाण दिग्दर्शित ‘मानापमान’ नाटक चालू असल्याने) रसाळ सरांच्या केबिनमध्ये बसायचे. तेव्हा त्यांनी माझे खूप कौतुक केल्याचे रसाळ सरांनी मला सांगितले. तेव्हापासून मी शेफारायला आरंभ झाला म्हणा की!

‘प्रतिष्ठान’कडे अभिप्रायार्थ आलेली पुस्तकं मी डॉ. सुधीर रसाळांच्या घरी नेऊन देत असे. त्यांना चाळताना सर माझे मत विचारायचे. याचा अर्थ ही पुस्तके वाचूनच त्यांना मी देत असेल असा होता. हा माझा अजून गौरव होता. आलेली पुस्तके वाचून झाल्यानंतरच सरांकडे नेऊन देण्यामुळेच मला त्या पुस्तकावर त्यांच्याशी चर्चा करता यायची. वर्गातही एखाद्या पुस्तकाचे नाव आठवले नाही की त्याचा थोडा तपशील देत मला विचारायचे. वसेकर, ती कुठली कादंबरी आहे. ज्यात एक इंग्रज अधिकारी जबरदस्तीने पतीच्या चितेवर जाळल्या जाणाऱ्या स्त्राrला वाचवतो व आपल्याकडे आश्रय देतो. तो अधिकारी वारल्यानंतर मात्र ती स्वतहून सती जाते? याचा अर्थ गुरुवर्य मी हे सगळे वाचतो असे गृहीत धरतात! याचा दुसरा अर्थ मी सपाटून वाचले पाहिजे असा होत होता. अक्षरश सकाळी नऊ साडेनऊला मी आणि ग. धों. देशपांडे विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या दारात हजर असू आणि शेवटच्या बसने औरंगपुऱ्यात परत येत असू.

प्रतिष्ठानकडे येणारे साहित्य मी रसाळ सरांकडे एका पाकिटात घालून पोहोचते करायचो. सर मला स्वीकृत साहित्यावर खूण करून त्यांना पत्र लिहायला सांगायचे. अधीर कवींची परिषदेत ये-जा असे आणि तिथे मीच एकटा बसलेला असायचो. खूप साहित्यिक आले, गप्पा मारल्या, गेले. अनेक नव्या ओळखी झाल्या. डॉ. चंद्रकांत पाटलांचा वत्सल सहवास – हिंदी कवितेच्या दोन-तीन अंकांच्या निमित्ताने मला मिळाला. स्वीकृत साहित्याचा निर्णय माझ्या तोंडूनच लेखक कवींना कळायचा. रसाळ सरांनी तुमची अमुक कविता, अमुक कथा निवडली असे त्याचे नाव न सांगता मीच जणू काही तुमचे साहित्य स्वीकारले आहे अशा ऐटीत सांगायचो. पुढच्या अंकात तुम्ही आहात ही शुभवार्ताही संबंधितांना द्यायचो. त्यामुळे लेखक-कवी अकारण माझ्याशी कृतज्ञतेने वागू लागले.

परिषदेचा तेव्हा फारच मंदीचा काळ होता. कारण कुणाकडे वेळ नव्हता. प्राचार्य कौतिकराव ठाले यांनी समर्पित भावनेने परिषदेला पूर्ण वेळ द्यायला आरंभ केला आणि परिषद चैतन्यमय झाली. कार्यक्रमांची रेलचेल वाढली. लेखकांची ये-जा वाढली. कधीही जा, ठाले तर तिथे तुम्हाला भेटतील. आता माझा मित्र डॉ. दादा गोरेही ठाले सरांना आणि परिषदेला वेळ देतो. साहित्य संमेलनांची संख्या वाढली. सातत्य वाढले. ठाले सरांमुळे हे घडू शकले. त्यांचे श्रेय नाकारण्याचा कृतघ्नपणा कोणीही करणार नाही. मी तर परिषदेला आई मानतो. खरे तर माझ्या शिक्षणाच्या संदर्भात तिने माझ्या ‘बापा’चीच भूमिका वठवली आहे. पण परिषद हा शब्द स्त्राrलिंगी आहे म्हणून ‘आई.’

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली ही आनंदाची व समाधानाची बाब आहे. म.सा.प.च्या सर्व आजीमाजी पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.