
किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणांबाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफीत मोबाईल, तसेच सोशल मीडियाद्वारे प्रसारित करून सामाजिक अस्थिरता, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी जिह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023चे कलम 163 जारी केले आहे. शुक्रवार(दि. 19)पर्यंत कोल्हापूर जिह्यात या कलमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीस इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरविणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट वा फॉरवर्ड करणे आणि जिह्यात समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, हार्ंडग प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयास प्रचलित कायद्यान्वये फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.
इम्तियाज जलील यांच्या कोल्हापूर दौऱयाला सकल हिंदू समाजाचा विरोध
विशाळगड ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मुसलमान समाजातील लोकांना एकत्र करून 19 जुलै रोजी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. ते कोल्हापुरात आल्यास त्यांचे कोल्हापुरी चपलेने ‘स्वागत’ करू. तसेच ‘कोल्हापूर बंद’ करण्याचा इशाराही सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषेदत देण्यात आला.
शासनाकडून 50 हजारांच्या मदतीचे वाटप
गजापूर पैकी मुसलमानवाडी (ता. शाहूवाडी) येथे तातडीची मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी व घरदुरुस्तीसाठी 50 हजार रुपयांच्या मदतीचे वाटप शासनाकडून करण्यात आले. मुसलमानवाडी येथील अंदाजे 41 घरांची जमावाने नासधूस करून प्रापंचिक साहित्याचे नुकसान केले होते. या नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करून शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेले आहेत. वाडीमध्ये अंदाजे 56 कुटुंबे राहतात. या 56 कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रत्येकी प्रापंचिक साहित्यासाठी 25 हजार रुपये आणि घरदुरुस्तीसाठी 41 घरांना प्रत्येकी 25 हजार रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले.
महायुतीचे नेते फिरकलेच नाहीत!
विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिमेला रविवारी लागलेल्या हिंसक वळणात गजापूर-मुसलमानवाडीत समाजपंटकांच्या जाळपोळीत 50हून अधिक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती, महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी पीडितांची भेट घेऊन दिला. मात्र, अपक्ष व भाजपचे समर्थक स्थानिक आमदार विनय कोरे, दुसऱयांदा खासदार झालेले महायुतीचे धैर्यशील माने हे फिरकले नसल्यामुळे लोकप्रतिनिधींविषयी जिह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.