जामिनावर सुटताच विशाल अगरवालला हिंजवडी पोलिसांच्या बेड्या

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा दोष स्वतःवर घेण्यासाठी कार चालकाला धमकावल्या प्रकरणी कारागृहात असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालला न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर एका फसवणुकीच्या गुह्यात त्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

बावधन येथील नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सीमधील 72 जणांनी आरोपींकडून सदनिका खरेदी केल्या आहेत. सदनिका आणि इतर सोयीसुविधा देण्यासाठी ठरलेली रक्कम सर्वांनी आरोपी विकासकांना दिली. सोसायटीच्या मालकीच्या असणाऱया पार्ंकग आणि ऑमिनिटीची जागा व मोकळी जागा सोसायटीला देणे बंधनकारक होते, असे असताना त्यांनी त्या प्रकल्पात एकूण तीन सोसायटय़ा तयार केल्या.

प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणची ऑमिनिटीची आणि मोकळी जागा नकाशामध्ये दाखवली. वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजूर करून घेतले. सोसायटीची परवानगी न घेता विकासकांनी सोसायटीच्या जागेवर विंटेज टॉवर आणि विंटेज हाय या नावाने दोन इमारती बांधत सदनिका धारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत नॅन्सी ब्रह्मा असोसिएटस या प्रकल्पाचे विकासक विशाल अगरवालसह साथीदारांविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल आहे.

बावधन येथील एका फसवणुकीच्या गुह्यात विशाल अगरवाल याला मंगळवारी ताब्यात घेण्यात आले असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
– कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी