आधारकार्डमधील माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व्हर्च्युअल आयडी क्रमांक फार महत्त्वाचा आहे. यामुळे तुमची माहिती लिक होण्याचा धोका कमी होतो. व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय ते आज जाणून घेऊ या. आधारकार्ड हा ओळखीचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. लहान बाळापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आधारकार्ड बंधनकारक आहे. सरकारद्वारे यूआयडीएआय ही संस्था आपल्याला आधारकार्ड जारी करते. आपला आधारकार्ड नंबर 12 क्रमांकांचा असतो. मात्र त्याच वेळी 16 अंकी तात्पुरता कोडदेखील जारी करते, जो पडताळणीच्या वेळी वापरला जातो. व्हर्च्युअल आयडी म्हणून हा 16 अंकी नंबर आधार क्रमांकाशी जोडला जातो. म्हणजे साधारणपणे, व्हर्च्युअल आयडीचे 16 क्रमांक हे तुमच्या आधारच्या 12 क्रमांकांना पर्याय आहेत.
व्हीआयडी अनेकदा जनरेट करता येतो
व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी) हा तात्पुरत्या स्वरूपाचा क्रमांक असल्याने तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा ऑनलाइन जनरेट करू शकता. आधारकार्डच्या सुरक्षेसोबतच त्यासोबत फसवणूक होण्याचा धोकाही कमी होतो. व्हर्च्युअल आयडी सामान्यतः ई-केवायसी पडताळणीसाठी वापरला जातो.
अधिक सुरक्षित
अनेक वेळा आधारशी संबंधित माहिती लीक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी यूआयडीएआयने व्हर्च्युअल आयडीची संकल्पना आणली आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे आधार क्रमांकावरून व्हीआयडी जनरेट करता येतो. मात्र एखाद्याच्या व्हीआयडीवरून आधार क्रमांक शोधू शकत नाही.
असा बनवा तुमचा व्हर्च्युअल आयडी
व्हर्च्युअल आयडी तयार करणेदेखील खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही यूआयडीएआयच्या अधिकृत साईटवर जा किंवा mAadhaar अॅप वापरा. यूआयडीएआयची साइट उघडल्यानंतर आधार सर्व्हिसचा पर्याय निवडा आणि व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी) जनरेटरवर क्लिक करा. आधार व्हर्च्युअल आयडी काही ठिकाणी उपयोग पडते. आधारला पर्याय म्हणून त्याचा वापर होतो. आधार क्रमांक न सांगता बँक खाते उघडू शकता. सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना व्हीआयडीचा वापर करू शकता.