
इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ वेगळ्यात अंदाजात खेळताना दिसतोय. यंदाच्या हंगामात आरसीबीची सुरुवात दमदार झाली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना आरसीबीने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. गुणतालिकेमध्ये आरसीबी पहिल्या स्थानावर विराजमान आहे. याच दमदार कामगिरीनंतर विराट कोहली याने संपूर्ण संघाला आपल्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी दिली. या पार्टीला चेन्नई सुपर किंग्ज संघाचा चाहता धोनीची जर्सी घालून उपस्थित होता. त्याला पाहताच विराट कोहली याने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की विराट कोहली ब्लॅक कपड्यांमध्ये रेस्टॉरंटमध्ये येतो. यावेळी रेस्टॉरंटमध्ये चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालून उभ्या असलेल्या एका चाहत्यावर त्याची नजर जाते. त्याला पाहताच धोनी मजेशीर अंदाजात त्याच्याकडे इशारा करतो. त्याची ही प्रतिक्रिया पाहून तिथे उपस्थित लोकही दिलखुलास हसतात. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
View this post on Instagram
आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील लढत अधिक चर्चेत असायची. मात्र यंदा आरसीबी आणि सीएसके लढतही तितकीच चर्चेत राहिली. सोशल मीडियावर मैदानावरही दोन्ही संघाचे चाहते आपापसात भिडताना दिसले. अशात विराटच्या रेस्टॉरंटमध्ये सीएसकेचा चाहता पिवळी जर्सी घालून घुसला, त्यामुळे आगामी काळात दोन्ही संघातील चाहत्यांमध्ये हे द्वंद्व आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बंगळुरुची दमदार कामगिरी
यंदाच्या हंगामात बंगळुरूने रजत पाटीदार याच्याकडे नेतृत्व सोपवले. तरुण खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळाताना बंगळुरुने झोकात सुरुवात केली. पहिल्यात लढतीत बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा त्यांच्याच घरात पराभव केला. त्यानंतर चेन्नईमध्ये जाऊन सीएसकेलाही पराभवाचे पाणी पाजले. तब्बल 17 वर्षानंतर बंगळुरूने चेपॉकचा किल्ला भेदत चेन्नईला हरवले. त्यामुळे आगामी काळातही बंगळुरू चांगली कामगिरी करेल आणि यंदा तरी विजेतेपद पटकावेल अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.