गयानामध्ये झालेल्या सेमीफायनल लढतीत इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 172 धावांचे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकी, तर जसप्रीत बुमराहच्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ ढेपाळला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 103 धावांमध्ये गारद झाला.
अक्षर व कुलदीपने प्रत्येकी 3, तर बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही या विजयात मोलाची भूमिका बजावली. रोहितने अर्धशतकीय, तर सूर्याने 47 धावांची बहुमुल्य खेळी करत टीम इंडियाला दहा वर्षानंतर टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचवले. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 29 जून रोजी हा सामना रंगेल.
इंग्लंडविरुद्ध विजय मिळवत फायनल गाठल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, सामना जिंकल्याचे नक्कीच समाधान असून आम्ही एकजुटीने मेहनत घेतली. सामना जिंकण्यासाठी सर्वांनीच कसोशीने प्रयत्न केले. येथील परिस्थितीशी जुळवून घेणे आव्हानात्मक होते, मात्र आम्ही परिस्थितीशी जुळवून घेतले. स्पर्धेतील यशामागे हेच गमक असून गोलंदाज आणि फलंदाजांनी परिस्थितीशी जुळवून घेत कामगिरी केली तर चांगला परिणाम दिसतून येतो हेच आज घडले.
या खेळपट्टीवर एकवेळ 140-150 धावा पुरेशा ठरतील असे वाटत होते. पण सामना जसाजसा पुढे सरकर गेला त्याप्रमाणे मी आणि सूर्याची भागीदारी पाहता आम्ही आणखी 25 धावा केल्या पाहिजेत असे वाटले. मी एक लक्ष्य निश्चित केले होते, मात्र याबाबत कोणाशीही बोललो नाही. त्यांनी कोणताही दबाव न घेता फलंदाजी करावी हा यामागील उद्देश होता. आम्ही परिस्थितीशी जुळवून घेत चांगली फलंदाजी केली आणि 170 धावा उभारल्या. खेळपट्टी पाहता ही चांगली धावसंख्या होती, असेही रोहित म्हणाला.
दरम्यान, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या फिरकीचेही रोहित शर्माने कौतुक केले. दोघेही उत्कृष्ट फिरकीपटू असून अचूक गोलंदाजी कशी करायची याचे दडपण त्यांच्यावरही होते. मात्र ते शांत राहिले आणि पहिल्या डावानंतर चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी स्टंप्सवर मारा केला, असेही रोहित म्हणाले. यावेळी त्याने विराट कोहलीच्या खराब कामगिरीवरही टिप्पणी केली.
View this post on Instagram
विराट कोहली हा उत्कष्ट खेळाडू असून कोणत्याही खेळाडूचा बॅड पॅच येऊ शकतो. पण त्याच्या खेळण्याची पद्धत आणि अशा मोठ्या स्पर्धांमधील त्याचे महत्व आम्हाला माहिती आहे. 15 वर्ष खेळलेल्या खेळाडूसाठी फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. कदाचित त्याने त्याची सर्वोत्तम खेळी फायनलसाठी राखून ठेवली असावी, असेही रोहित म्हणाला.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली लवकर बाद झाला. टोपलीने त्याला 9 धावांवर बाद केले. या स्पर्धेत आतापर्यंत त्याची कामगिरी त्याच्या नावाला साजेशी झालेली नाही. 7 डावात त्याला फक्त 75 धावा करता आलेल्या आहेत. यादरम्यान त्याला एकदाही 50 धावांचा आकडा गाठता आलेला नाही.
T20 WC 2024 : इंग्लंडला मात देत हिंदुस्थानचा फायनलमध्ये प्रवेश, जेतेपदासाठी आफ्रिकेशी होणार सामना