
टीम इंडियाचा स्टार आणि सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये (IPL 2025) आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करत आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उंचावल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीची जोरदार चर्चा झाली. दोघेही आता निवृत्ती घेणार असल्याचे वारंवार बोलले जात होते. परंतु आता विराट कोहलीने एका कार्यक्रमामध्ये या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित आणि विराट कोहलीच्या निवृत्ती संदर्भात बऱ्याच वेळा विविध माध्यमांवर चर्चा झाल्या. रोहित शर्माने इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. दोघेही सध्या आयपीएलमध्ये आपापल्या संघांकडून खेळताना दिसत आहे. विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकत विरोधकांची बोलती बंद केली आहे. याच दरम्यान एका कार्यक्रमामध्ये तो सहभागी झाला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमामध्ये महिला समालोचक विराटला विचारते की, तुमच्यासाठी भविष्यात मोठं पाऊल कोणतं असणार आहे? यावर कोहली म्हणतो की, “बहुतेक 2027 चा वर्ल्ड कप जिंकने.” त्याच्या या उत्तराला उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एका कार्यक्रमात “2027 चा वर्ल्ड कप जिंकने हे माझ्यासाठी एक मोठं पाऊल असेल,” असं वक्तव्य केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.#ViratKohli #India #IPL2025 pic.twitter.com/k6uI3dtiAj
— Saamana Online (@SaamanaOnline) April 1, 2025
विराट कोहलीच्या या उत्तरामुळे एक प्रकारे त्याच्या निवृत्ती संदर्भात फिरत असलेल्यांना अफवांना पूर्णविराम बसला आहे. तसेच विराट कोहली 2027 चा वर्ल्ड कप खेळण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. 2027 चा वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या देशांमध्ये संयुक्तरित्या खेळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामीबिया पहिल्यांदाच यजमानपद भुषवणार आहे.