यशस्वी भव: पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र खेळाडूंना कोहलीच्या ‘विराट’ शुभेच्छा

जगात महाशक्ती होत असलेल्या हिंदुस्थानला क्रीडाशक्ती बनवण्यासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या सर्व खेळाडूंना यशस्वी भवः अशा विराट शुभेच्छा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने दिल्या. येत्या 26 जुलैपासून हिंदुस्थानचा सव्वाशे खेळाडूंचे पथक विक्रमी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सध्या जगात केवळ आणि केवळ पॅरिस ऑलिम्पिकची चर्चा सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये पदकविजेती कामगिरी करण्यासाठी हिंदुस्थानचे सारेच खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. या खेळाडूंना नवी ऊर्जा मिळावी, प्रोत्साहन मिळावे म्हणून आज विराटने सोशल मीडियावर आपला एक व्हिडीओ शेअर करत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया हिंदुस्थानींना शुभेच्छा दिल्या आणि पदक जिंकून हिंदुस्थानचे नाव उंचवा, असेही आवाहन केले.

विराट कोहली आपल्या मिनीटभराच्या शुभेच्छा व्हिडीओत भरभरून बोलला. तो म्हणाला, सध्या हिंदुस्थानात झपाटय़ाने क्रीडा संस्कृती वाढत असली तरी आपला देश गारुडय़ांचा आणि हत्तींचा देश मानला जायचा. पण आता तसं राहिलेलं नाही. आता आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आणि जागतिक तंत्रज्ञानाचा देश बनला आहे. आपण खेळ आणि बॉलीवूडसाठी आणि वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी ओळखले जाऊ लागलो आहोत.

आता आपल्या महान देशासाठी कोणती गोष्ट मोठी राहिली आहे? तर आपल्यासाठी सुवर्ण, रौप्य आणि कास्य जिंकणे महत्त्वाचे झाले आहे. आमचे भाऊ-बहिणी पदक जिंकण्यासाठी, देशाचा तिरंगा फडकावण्यासाठी, जन गण मनचे सूर ऐकविण्यासाठी पॅरिसला जात आहेत. जेव्हा ते ट्रक अॅण्ड फिल्ड, रिंगमध्ये, कोर्टवर उतरतील तेव्हा 140 कोटी हिंदुस्थानींच्या नजरा त्यांच्यावर असतील. आता प्रत्येक नाक्यावर, चौकांवर, रस्त्यावर आणि गल्लोगल्ली ‘इंडिया… इंडिया…’चा जयघोष होईल. त्यामुळे देशाचा तिरंगा घेऊन पोडियमच्या दिशेने पावले टाकणाऱया त्या खेळाडूंचे चेहरे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. जय हिंद आणि हिंदुस्थानी पथकाला हार्दिक शुभेच्छा. हिंदुस्थानातील अनेक खेळाडू प्रशिक्षणासाठी आणि तयारीसाठी परदेशातच असल्यामुळे अनेक जण थेट पॅरिसला जाणार आहेत. टोकियोत हिंदुस्थानने सात पदके जिंकली होती. मात्र यंदा नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन आणि मुष्टियुद्धासह भालाफेकपटू नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा आहे.