सचिनच्या विक्रमापासून दूर जातोय विराट; कसोटीतील सर्वाधिक शतके आणि धावांचा विक्रम मोडणे कठीण

पाच वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या बॅटमधून ज्या वेगात धावांचा आणि शतकांचा पाऊस पडत होता, तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उभारलेले विश्वविक्रम विराटच मोडणार असे सारेच म्हणत होते. खुद्द सचिननेही आपले विक्रम विराटनेच मोडावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण गेल्या पाच वर्षांत विराटच्या अपयशी खेळामुळे सारे चित्रच बदलले गेलेय. पर्थ कसोटीत त्याने 30 वे कसोटी शतक झळकावले असले तरी तो आता सचिनच्या कसोटी धावा आणि शतकांच्या विक्रमपासून खूप दूर फेकला गेला आहे. त्याचा खेळ पाहता तो कसोटीत 50 शतके आणि 16 हजार धावा करण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.

विराट कोहलीचा 2016 ते 2019 या चार वर्षांतील धावांचा आणि शतकांचा वेग पाहता तो सचिनच्या विक्रमांना सहज मोडीत काढील, असे भाकीत वर्तवण्यात आले होते. 2019 सालापर्यंत विराटने कसोटी क्रिकेटमध्ये 84 सामन्यांत 27 शतके आणि 7202 धावा केल्या होत्या. तेव्हा शतकांच्या बाबतीत विराट कोहलीच्या आसपास कुणीच नव्हता. स्टीव्हन स्मिथ आणि केन विल्यम्सन चांगले फॉर्मात होते, पण ते सचिनच्या विक्रमांच्या शर्यतीत वाटत नव्हते. मात्र जिथे विराटचे अपयश सुरू झाले, तेथेच इंग्लिश फलंदाज ज्यो रुटची कारकीर्द बहरायला लागली.

2019 सालापर्यंत रुटने 88 कसोटींत 7282 धावा केल्या होत्या. त्या कोहलीपेक्षा काहीशा जास्तच होत्या, पण त्याच्या खात्यात केवळ 17 शतकेच होती. मात्र गेल्या पाच वर्षांत रुटने धावांचा आणि शतकांचा पाऊस पाडत चक्क सचिनच्या विक्रमांचा वेगवान पाठलाग सुरू केला आहे. गेल्या पाच वर्षांत रुटने 5500 पेक्षा अधिक धावा आणि 18 शतके साजरी केली आहेत. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत तो 63 कसोटी सामने खेळला आहे. विराटच्या बाबतीत सांगायचे तर गेल्या पाच वर्षांत त्याच्या बॅटमधून 35 कसोटींत केवळ 3 शतके आणि 1900 धावा निघाल्या आहेत. यावरून कुणीही अंदाज बांधू शकतो की विराट किती अपयशी ठरला आहे ते.

अभी नहीं तो कभी नहीं…

सचिनच्या सर्वाधिक कसोटी धावांचा आणि शतकांचा विक्रम आता खेळत असलेल्या रुट, कोहली, स्मिथ आणि विल्यम्सनसारख्या दिग्गजांपैकीच कुणीतरी एक मोडू शकतो. टी-20 च्या जमान्यात भावी पिढीतील खेळाडूंचा कसोटी क्रिकेटकडे फारसा कल नसल्यामुळे हे विक्रम नव्या पिढीतील फलंदाजांकडून मोडणे अशक्य दिसतेय. त्यामुळे रुट, कोहलीकडून हे विक्रम मोडले न गेल्यास सचिनचे हे विक्रम कायमस्वरूपी अबाधित राहू शकतात. सध्या हे चार फलंदाज वगळता कसोटीत पाच हजारांपेक्षा अधिक धावा करणारे केवळ पाचच फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये आहेत आणि त्यांच्यापैकी कुणी या विक्रमांच्या जवळ जाण्याचीही तूर्तास शक्यता नाही. त्यामुळे सचिनचा विक्रम मोडला गेला तर आत्ताच, अन्यथा कधीच नाही.

सचिनचा पाठलाग कोण करणार?

सचिनच्या कसोटीतील 15,921 धावा आणि 51 कसोटी शतकांचा विक्रम आजच्या घडीला कोण मोडू शकतो हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण रुट या शर्यतीत सर्वात पुढे आहे. तो सचिनच्या विक्रमापासून 3167 धावा 17 शतके मागे आहे. रुट आता 34 वर्षांचाच असून तो अजून किमान तीन वर्षे सातत्याने क्रिकेट खेळला तरी तो सचिनच्या दोन्ही विक्रमांना सहज मागे टाकू शकतो. दुसरीकडे 36 वर्षीय विराट सचिनपासून 6786 धावा दूर आहे. शतकांच्या बाबतीत आता तो तिशीत पोहोचलाय. त्याची अपयशी कामगिरी पाहता तो अजून पाच-सहा वर्षे क्रिकेट खेळण्याची शक्यताही कमीच वाटतेय. गेल्या पाच वर्षांत ढासळलेल्या कामगिरीमुळे विराटची कारकीर्द फार काळ लांबेल, याबाबत सारेच साशंक आहेत.