रोहित, विराटचा वाजणार लंकेत डंका, नवप्रशिक्षक गौतम गंभीर यांचा राखला मान

टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचे सीनियर्स खेळाडूंनी थोडासा ब्रेक घेतला होता. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही श्रीलंका दौऱ्यातून अंग काढणार अशी चर्चा होती. मात्र या दोघांनीही श्रीलंका दौऱयावर जायला हवे, असे मत टीम इंडियाचे नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर नवीन प्रशिक्षकांचा मान राखत रोहित आणि विराट या दोघांनीही श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे या दोघांचाही डंका लंकेत वाजणार हे स्पष्ट झाले आहे.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा पुढील आठवडय़ापासून सुरू होणार आहे. या दौऱयात तीन सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांची कारकीर्ददेखील याच मालिकेपासून सुरू होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी- 20 वर्ल्ड कपनंतर संपला. बीसीसीआयनं गौतम गंभीर याच्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह हे प्रमुख खेळाडू खेळणार नाहीत अशी चर्चा होती, तर हार्दिक पंडय़ाने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतलेली आहे. रोहित शर्माने बीसीसीआयला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचे कळवल्यानंतर विराट कोहलीनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे. विराटदेखील श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. बीसीसीआयला विराटने याबाबत कळवले आहे.

श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गौतम गंभीरने रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी श्रीलंका दौऱयात खेळले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार विराटने एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र ते एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट यापुढेही खेळतच राहणार आहेत.