अहो आश्चर्यम्… विराट रणजी खेळणार! आगामी रणजी मोसमासाठी दिल्लीच्या 84 सदस्यीय संभाव्य संघात निवड

दिल्ली क्रिकेट संघटनेने आगामी रणजी मोसमासाठी तब्बल 84 खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर केला आणि यात विराट कोहलीसह ऋषभ पंतच्या नावाचाही समावेश केला. ही यादी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गेली 12 वर्षे रणजीपासून दूर असलेला विराट पुन्हा देशी क्रिकेटमध्ये दिसेल, याबाबत क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही साशंकता कायम आहे. येत्या 11 ऑक्टोबरपासून रणजी मोसमाला प्रारंभ होत असून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये व्यस्त असलेला विराट कोहली आपला कसोटीचा फॉर्म मिळवण्यासाठी एखाद दुसरा रणजी सामना खेळू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

विराट कोहली तब्बल 12 वर्षांपूर्वी रणजी स्पर्धेत अखेरचा खेळला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यस्त झाल्यामुळे तो महत्त्वाच्या स्पर्धेपासून दूर झाला तो पुन्हा खेळलाच नाही. तसेच गेल्या 12 वर्षांत त्याच्यावरही कुणी रणजी किंवा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा दबाव टाकला नव्हता. मात्र गेल्याच वर्षी बीसीसीआयने हिंदुस्थानी संघात असलेल्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे, असे निर्देश दिले आहेत. तसेच कसोटीत आपल्या फॉर्मसाठी झगडत असलेला विराट फलंदाजीच्या सरावासाठी रणजी मोसमाच्या प्रारंभी खेळताना दिसू शकतो.

विराटला रणजी खेळण्याची संधी

हिंदुस्थानी संघाच्या कसोटी सामन्यांदरम्यानच रणजीचा मोसम सुरू होतोय. पण काही कसोटी सामन्यांच्या आधी किंवा नंतर रणजी सामने बीसीसीआयने आयोजित केले आहेत. त्यामुळे या सामन्यात हिंदुस्थानी संघातील स्टार खेळाडूही खेळू शकतात. येत्या 11 ऑक्टोबरपासून दिल्लीचा संघ छत्तीसगडविरुद्ध आपल्या मोसमाचा प्रारंभ करणार आहे. हा सामना 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान खेळविला जाणार आहे, तर 16 ऑक्टोबरपासून बंगळुरूत न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी सुरू होत आहे. त्यामुळे या सामन्यासाठी विराट रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर नोव्हेंबरच्या अखेरीस हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाच्या महादौऱ्यावर जाणार असून या मालिकेपूर्वी 13-16 नोव्हेंबरदरम्यान दिल्ली-झारखंड यांच्यात रणजीचा साखळी सामना खेळविला जाणार आहे. विराटच्या फलंदाजीचा सूर गवसला नाही तर तो या सामन्यात खेळण्याचाही प्रयत्न करू शकतो. तसेच या सामन्याआधी 6 ते 9 नोव्हेंबरला चंदिगडविरुद्धही सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी या दोनपैकी एका सामन्यात विराट कोहलीला खेळण्याचे भाग्य लाभू शकते.

विराटला रणजीची गरज भासणार

शुक्रवारपासून बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरू होतोय. या सामन्यानंतर दुलीप करंडकाचाही सामना खेळला जाणार आहे. कानपूर कसोटीही तीन-चार दिवसांत संपली तर सध्या हिंदुस्थानी संघात असलेले काही खेळाडू दुलीप करंडकातही दिसू शकतात. या सामन्यात विराट कोहली किंवा ऋषभ पंतची खेळण्याची शक्यता कमी असली तरी सरफराज खान, ध्रुव जुरेल, यश दयालसारखे खेळाडू नक्कीच दिसतील. विराटला कसोटीत शेवटचे शतक ठोकून आता 14 महिने उलटलेत. यादरम्यान तो केवळ तीनच कसोटी खेळला आहे आणि त्याने या कसोटींच्या सहा डावांत 38, 76, 46, 12, 6, 17 अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे कानपूर कसोटीत विराटची बॅट तळपली नाही तर धावांच्या शोधासाठी तो रणजी क्रिकेटचे दारही ठोठावू शकतो.