विरार रेल्वे स्थानकात रक्तरंजित थरार, रेल्वे पूलावर महिलेवर पतीकडून चाकूने प्राणघातक हल्ला

गेल्या पंधरा दिवसांत वस‌ई – विरारमध्ये तीन महिलांच्या झालेल्या हत्येनंतर शहरात खळबळ उडाली असताना बुधवारी सकाळी भर रेल्वे स्थानकावर चाकुहल्ला झाल्याने वस‌ईत महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आरती यादव हत्या प्रकरण ताजे असतानाच विरारमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर २७ वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला तिच्या पतीने केला असून प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले आहे. सध्या महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

27 वर्षीय महिला कामावर जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात आली होती. सकाळी 7 च्या सुमारास ती विरार स्थानकाच्या दक्षिण दिशेला पूलावर जात असताना मागून आलेल्या तिच्या पतीने तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिक प्रवाशांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी आरोपी शिव शर्मा याला ताब्यात घेतले. त्याला वसई लोहमार्ग रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जखमी महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही याबाबत महिलेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करू, असे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तुंबडा याने सांगितले.

मागील महिन्यात वसईत भर रस्त्यात आरती यादव या तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. पुन्हा तशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.