विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर सुसाट, एमएसआरडीसीने महामार्गाच्या कामासाठी मागवल्या निविदा

मुंबईसह परिसरातील विकासाला गती देणाऱया विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरचे काम आता सुसाट होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विरार- अलिबाग या सुमारे 14 पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या आहेत. पहिल्या टप्प्यात विरार-बालवलीदरम्यान सुमारे 96 किलोमीटरचा महामार्ग तयार केला जाणार असून त्यासाठी तब्बल 19 हजार 334 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

विरार-अलिबागदरम्यान 126 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड हायटेक महामार्ग उभारण्याचे नियोजन 2011 मध्ये एमएमआरडीएने केले होते. मात्र त्यावर पुढील सात ते आठ वर्षे कोणतीच कार्यवाही न झाल्याने सदरच्या महामार्गाची उभारणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्याचे सरकारने नियोजन केले होते. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने पहिल्या टप्प्यात विरार-बालवलीदरम्यान काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा मागवल्या आहेत. सदरचे काम अकरा पॅकेजमध्ये केले जाणार आहे.

दहा ठिकाणी इंटरचेंज असणार

चौदा लेन असलेल्या या ग्रीनफिल्ड हायवेवर दहा ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, ठाणे-कल्याण-नगर मार्ग, तळोजा एमआयडीसी बायपास, मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे एक्प्रेस वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पनवेल-जेएनपीटी महामार्ग, मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक या ठिकाणी इंटरचेंज असणार आहे.

–  एसएसआरडीसीने 137 किलोमीटर लांबीच्या पुणे रिंग रूटसाठीही निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी 16 हजार 617 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

– 184 किलोमीटर लांबीच्या जालना-नांदेड महामार्गासाठीही निविदा मागवल्या असून त्याकरिता जवळपास 11 हजार 168 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.