Viral Video: हिंदुस्थानातील वातावरण AI तंत्रज्ञानात अग्रेसर होण्यासाठी पोषक आहे का?

AI हा शब्द आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत चालला आहे. कोणतंही उपकरण घ्यायला जा, सोशल मीडियावर जा AI हा शब्द तुम्हाला कुठे न कुठे आढळेलच. एका बाजूला अनेक कार्यालयांमध्ये पैसे वाचवून अधिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी AI ची मदत घेतली जात आहे. तर दुसरीकडे, सामान्य माणूस कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या रोबोट्स आणि रोबोटिक प्रक्रियांद्वारे नोकरीतून काढून टाकल्या जाण्याच्या भितीखाली जगत आहे. मात्र प्रत्यक्षात AI तंत्रज्ञानास पुरक शिक्षण घेतल्यास नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास देखील अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदुस्थानातील तरुण वर्ग AI मधील या सर्वोत्कृष्ट नवकल्पना कशा प्रत्यक्षात राबवता येतील आणि या वाढत्या तंत्रज्ञानामध्ये ते कसे योगदान देऊ शकतात याचा विचार करण्यात व्यस्त आहेत. पण यात अधिक महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 1.5 अब्ज लोकसंख्या असलेल्या बलाढ्य हिंदुस्थान AI तंत्रज्ञानात आघाडीवर कसा जाईल?

जिथून सर्वात बुद्धीमान आणि कार्यक्षम मनुष्यबळ, IIT मधून उत्तीर्ण झालेले आणि त्यापैकी अनेक जे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सीईओ बनतील अशा क्षमतेचे लोक आहेत त्याच हिंदुस्थानात अजूनही तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये अभाव आहे, तो म्हणजे संशोधन आणि विकासाबाबतची निराशा, भांडवलाची कमतरता आणि त्यास पोषक वातवरण नसणे, त्यासोबतच हार्डवेअर तंत्रज्ञान.

यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग संदर्भात हिंदुस्थानात आज काय स्थिती आहे, यावर हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.