आता व्हीआयपी नंबर मिळणार ऑनलाइन, आरटीओतील हेलपाटे थांबणार

दुचाकी किंवा चारचाकी गाडी घेतल्यानंतर तिचा नंबर हटके, सगळ्यांमध्ये उठून दिसणारा असावा, यासाठी व्हीआयपी नंबर मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते. त्यासाठी आरटीओत जाऊन हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता हा व्हीआयपी नंबर ऑनलाइन मिळवणे शक्य होणार आहे. त्यासाठी परिवहन या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार आहे.

चांगली नोकरी मिळाली, कोणी निवृत्त झाले किंवा अचानक झालेल्या धनलाभामुळे घर आणि गाडीचे स्वप्न सर्वसामान्य बघतात. घराचे स्वप्न पूर्ण झाले की, गाडी घेतली जाते. आपल्या गाडीकडे सगळ्यांचे लक्ष जावे, यासाठी हटके किंवा व्हीआयपी नंबरची प्लेट असावी, यासाठी आरटीओत चकरा माराव्या लागतात. मात्र, त्यासाठी वेळ तर जातोच, पण अवाच्या सवा पैशाची मागणी केली जाते. मात्र, आता ऑनलाइन पद्धतीने व्हीआयपी नंबरसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. परिवहन या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यावर पैसेही ऑनलाइन भरता येणार आहेत.

 अशी करा नोंदणी 

परिवहनच्या संकेतस्थळावर जाऊन प्रथम ई-मेल, मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर आपल्या पसंतीचा नंबर निवडायचा आहे. नंतर कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर व्हीआयपी नंबरसाठी किती पैसे भरायचे याची माहिती मिळणार आहे. पैसेही ऑनलाइन भरता येणार आहेत.