मारकुट्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना गुरासारखे बदडून काढले, गाल, बोटे सुजली, एका मुलाचा हात फॅक्चर

अभ्यासावरून एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना गुरासारखे बदडल्याची संतप्त घटना चौकजवळील देवन्हावे गावात घडली आहे. धक्कादायक म्हणजे या मारहाणीत अनेक मुलांचे हात, गाल, बोटे सुजली असून एका विद्यार्थ्यांचा हातही फॅक्चर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत होते. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या मुलांसह शाळेवर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारला. तसेच मारकुट्या शिक्षिकेचे तत्काळ निलंबन करा, अशी मागणी केली.

चौकजवळील देवन्हावे येथे केटीएसपी मंडळाचे श्री छत्रपती विद्यालय आहे. या शाळेत मीरकूटवाडी, देवन्हावे, दहिवली, सांगडेवाडी येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या शाळेत काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेल्या महिला शिक्षिका मुलांना अपमानास्पद वागणूक देत मारहाण करीत होत्या. मात्र विद्यार्थी भीतीपोटी हा सर्व प्रकार घरी सांगत नव्हते. आजारपणाची कारणे देऊन ते शाळेत जाण्यास नकार देत होते. संतापजनक म्हणजे दोन दिवसांपूर्वी या महिला शिक्षिकेने हद्दच करत मुलांना गुराढोरासारखी मारहाण केली. यात अनेक विद्यार्थ्यांचे हात, गाल, बोटे सुजेपर्यंत छडीने व हाताने मारहाण केल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. एका विद्यार्थ्यांचा तर हात फॅक्चर झाला आहे. ही सर्व मुले पाचवी ते आठवीच्या वर्गातील आहेत.