
पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधार्थ हिंसक निदर्शने झाली. हिंसाचाराच्या संदर्भात 110 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली, तर कथित हिंसक संघर्षानंतर दोन जण ठार झाले असे आज पोलिसांनी सांगितले. वाढत्या हिंसाचाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात वक्फ कायदा लागू होणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यामुळे सर्वांनी शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले.
हिंसाग्रस्त समसेरगंज भागात असलेल्या जाफ्राबादमध्ये बापलेकावर चाकूने हल्ला करण्यात आला. पीडितांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ‘चोरटय़ांनी घराची लूट केली आणि दोघांवर चाकूने वार करून पळ काढला,’ असा आरोप कुटुंबीयांनी केला. शुक्रवारी मालदा, मुर्शिदाबाद, दक्षिण 24 परगणा आणि हुगळी या जिह्यांमध्ये हिंसाचार उफाळला. पोलीस वाहनांसह अनेक वाहने संतप्त जमावाने जाळली.
सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली आणि अनेक रस्त्यांवरील वाहतूक रोखण्यात आली. हिंसाग्रस्त सर्व जिह्यांमध्ये पोलिसांनी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. मुर्शिदाबादमधील सुती येथून 70 आणि समसेरगंजमधून 41 जणांना अटक करण्यात आली. आज हिंसाचारग्रस्त भागात परिस्थिती तणावपूर्ण राहिली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मुर्शिदाबाद जिह्यातील विविध भागांमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
राजकारणासाठी दंगली भडकवू नका
पश्चिम बंगालमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू केला जाणार नाही, असा पुनरुच्चार ममता बॅनर्जी यांनी हिंसाचाराच्या घटनांवरून केला. हा कायदा केंद्राने बनवला असून त्यावर उत्तरे मागितली पाहिजेत. सर्व धर्माच्या लोकांनी शांतता राखावी. धर्माच्या नावाखाली कोणतेही अधार्मिक वर्तन करू नका. राजकारणासाठी दंगली भडकवू नका. दंगली भडकवणारे समाजाचे मोठे नुकसान करत आहेत. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, असे ममता यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मुर्शिदाबाद जिह्यात खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सुती आणि समसेरगंज भागात पोलिसांची गस्त असून कोणालाही एकत्र जमण्याची परवानगी नाही. लोकांनी अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले. दरम्यान सुती येथील चकमकीदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या एका मुलाला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुस्लिम लोकसंख्या असलेल्या जिह्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला.
ममता बॅनर्जी परिस्थिती हाताळण्यास असक्षम – भाजप
भाजपने राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला लक्ष्य करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी परिस्थिती हाताळण्यास असक्षम असल्याची टीका केली. राज्य सरकार अक्षम असेल तर त्यांनी केंद्राची मदत घ्यावी, असे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले. हिंसाचारामागे असलेल्यांची ओळख पटली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि कठोर कारवाई व्हायला हवी. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता. असेही सुवेंदू म्हणाले.