देवी विसर्जन मिरवणुकीवरुन पाच राज्यांत जाळपोळ, हिंसाचार; एक ठार

देवी विसर्जन मिरवणुकीवरून तसेच विविध कारणांवरून गेल्या दोन ते तीन दिवसांत देशात तब्बल पाच राज्यांमध्ये धार्मिक वाद निर्माण झाल्याने हिंसाचार उफाळून आला. कुठे डीजे लावण्यावरून तर कुठे मूर्तीची विटंबना झाल्यावरून तणाव निर्माण झाला. जाळपोळ, दगडफेक झाली. उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जमाव आणखीनच आक्रमक झाला आणि एक हॉस्पिटल पेटवून दिले. अशाप्रकारे तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि झारखंडमध्येही जाळपोळ करण्यात आली.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात जमावाचा रुद्रावतार पाहून पोलीसही मागे हटले. रविवारी हर्डी येथे दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी मिरवणूक मुस्लिमबहुल भागातून जात असताना डीजे वाजवण्यावरून दोन समुदायांमध्ये वाद झाला आणि हिंसाचार उसळला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 22 वर्षीय राम गोपाल मिश्रा हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाकडून 20 हून अधिक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. तरुणाच्या मृत्युमुळे जमाव अधिकच आक्रमक झाला आणि संतप्त लोकांनी 5 किमीचा मोर्चा काढला. दंगलीत ठार झालेल्या तरुणाची लांबलचक अंत्ययात्राही काढण्यात आली. अखेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने जवळपासच्या जिल्ह्यांतून अधिक फौजा मागवण्यात आल्या आहेत.

हैदराबाद

हैदराबादमधील पासपोर्ट कार्यालयाजवळील कुरमागुडा येथील मुथ्थालम्मा मंदिरात देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने मंदिरात घुसून मातेची मूर्ती फोडली. हे लज्जास्पद असून काही लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, असा दावा केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी केला. दरम्यान, हैदराबादमध्ये दोन दिवसांत मंदिर आणि पंडालची तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे.

कर्नाटक

बेळगाव जिल्ह्यातील सोलापूर गावात दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी दोन गटात हाणामारी झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. देवी विसर्जनाच्या वेळी महासी येथे हाणामारी झाली. याप्रकरणी 30 जणांना ताब्यात घेण्यात आले.

पश्चिम बंगाल

श्यामपूरमधील दुर्गापूजा पंडालची तोडफोड करण्यात आली. श्यामपूर बाजार व्यापारी समितीच्या पूजा मंडपात मूर्तीना आग लावण्यात आली तसेच इतर पंडालचीही तोडफोड केली असा दावा पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. दरम्यान, काहींनी विसर्जन घाटावर दगडफेकही केली. हावडा ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील श्यामपूर पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.

झारखंड

गढवा येथे देवी विसर्जनाच्या वेळी गावकरी आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वादग्रस्त मार्ग बंद केला होता, मात्र त्याच मार्गान मूर्ती नेण्यावर ग्रामस्थ ठाम होते. हा वाद इतका वाढला की पोलिसांना जमावावर नियंत्रण आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

उत्तर प्रदेशात पोलिसांचे निलंबन

दंगलीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जागे झाले आणि वातावरण बिघडवणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला. तसेच निष्काळजीपणाचा ठपका ठेवून हर्डी एसओ आणि महसी चौकीचे इन्चार्ज यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान दुर्गामूर्ती दर्शनासाठी बाहेर काढल्या जात असताना गोंधळ सुरू झाला. त्याचवेळी काही तरुणांशी वाद झाला. यानंतर प्रकरण वाढले आणि दगडफेक सुरू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, तसेच 15 ते 20 गोळ्या झाडल्या. यात भाऊ मारला गेला असा आरोप मृत रामगोपालचा भाऊ वैभव मिश्रा याने केला. पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्याने केली.