वक्फ कायदा लागू; पश्चिम बंगालमध्ये उद्रेक; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज

वक्फ सुधारणा कायदा मंगळवारपासून  देशभरात लागू झाला. गृहमंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. त्यानंतर देशभरात वक्फ सुधारणा कायद्याविरोधात असंतोष आज पुन्हा उफाळून आला. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधआत निदर्शने सुरू असताना अचानक हिंसाचार सुरू झाला. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत अनेक वाहने पेटवून दिली. पोलिसांची वाहनेही त्यांनी सोडली नाहीत. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले. दरम्यान, चेन्नई आणि कर्नाटक, इम्फाळ तसेच जम्मू-कश्मीरमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली.

आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत अनेक पोलीस जखमी झाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने वक्फ सुधारणा कायदा लागू झाल्याची घोषणा करताच मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात मुस्लिम संघटना निदर्शने करत होती. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफक सुरू केली. त्यांना पागवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या आणि लाठीचार्ज केला. त्यामुळे जमाव हिंसक झाला आणि त्यांनी पोलसांच्या  गाडय़ा तसेच इतर वाहने पेटवून दिली. त्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड येत्या 11 एप्रिलपासून वक्फ कायद्याविरोधात देशभरात निदर्शने करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात देशभरातून 15 याचिका

वक्फ कायद्याविरोधात देशभरात एपूण 15 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात पॅव्हेट दाखल केले आहे. कायद्याविरोधातील याचिका आणि सरकारचे पॅव्हेट याबाबत 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांमध्ये अनेक पक्षांच्या नेत्यांचाही समावेश आहे.

जम्मू-कश्मीर विधानसभेत हाणामारी

जम्मू आणि कश्मीर विधानसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी वक्फ कायद्यावरून गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी केली. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली.  विधानसभा अध्यक्ष वक्फविरोधातील आवाज दाबत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या तीन आमदारांनी लावून धरली. ही मागणी फेटाळण्यात आल्याने विरोधकांनी आणखी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहपूब करण्यात आले.