उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मथिदीत सर्वेक्षणावरुन सुरु झालेला गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान शनिवारी परिसरात हिंसाचार उफाळून आला आहे. येथे सर्वेक्षण सुरू असताना परिसरातील काही महिला व इतर लोकांनी छतावरून दगडफेक सुरू केली. या चकमकीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन महिला आणि इतर काही जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नोमान, बिलाल आणि नईम अशी तीन मृत व्यक्तींची नावे आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी सकाळी पोलिसांची संपूर्ण टीम सर्वेक्षणासाठी पोहोचली. यावेळी तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली, त्यानंतर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी आंदोलकांनी जाळपोळही सुरू केली. या घटनेत एसपीसह अनेक पोलीस जखमी झाले तर तीन जणांचा मृत्यू झाला.
संभलमधील दगडफेकीच्या घटनेवर पोलीस अधिकारी कृष्ण कुमार यांनी भाष्य केले आहे. ‘दगडफेक करणाऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांना आग लावून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई केली जाईल. या संपूर्ण घटनाक्रमाची ड्रोनच्या सहाय्याने व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने या सर्वांची ओळख पटवून त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणादरम्यान संभलमध्ये तणाव पसरल्यानंतर मुरादाबादचे डीआयजी मुनिराज यांच्यासह बरेली झोनचे एडीजी रमित शर्मा यांनाही तेथे पाठवण्यात आले आहे. याशिवाय पीएसीच्या तीन कंपन्याही संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.