उत्तर प्रदेशात जामा मशिदीच्या सर्वेक्षणावेळी हिंसाचार; तीन ठार

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीचे सर्वेक्षण सुरू असताना हिंसाचार भडकला. जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली तसेच वाहने पेटवून दिली. काही हल्लेखोरांनी घरांच्या छतावरून गोळीबार केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. या हिंसाचारात तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांच्या पायाला गोळी लागली आहे. तसेच 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या गोळीबारात कुणाचाही मृत्यू झालेला नाही, तर हल्लेखोरांच्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला. हल्ल्याप्रसंगी 12 आणि 14 वर्षांची मुले आणि महिलांना पुढे केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तीन तरुणांच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव आणखी वाढला आणि बर्क येथे दगडफेकीच्या घटना घडल्या.

20 पोलीस जखमी

हिंसाचारात 20 पोलीस जखमी झाले आहेत. हिंसाचाराच्या घटनांनंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून जामा मशिदीकडे जाणारे रस्ते बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले आहेत. दोन दिवस इंटरनेटबंदी लागू करण्यात आली असून 12वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, हल्लेखोरांना सर्वेक्षण पथकावर हल्ला करायचा होता. मोठय़ा संख्येने तरुणांनी चाकू आणले होते. मृत झालेल्या तरुणाकडूनही चाकू हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त ऑन्जनेय सिंह यांनी दिली.

नेमके काय घडले?

आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डीएम आणि एसपींसोबत एक पथक जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखल झाली. या पथकाला पाहून मुस्लिम समुदाय आक्रमक झाला. काही वेळातच घटनास्थळी तब्बल दोन ते तीन हजार लोक जमा झाले आणि मशिदीबाहेर तुफान गर्दीकेली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक सुरू झाली. अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे पोलिसांनीही पळ काढला, परंतु जमाव आणखी आक्रमक झाल्याने अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या तसेच लाठीचार्जही केला. त्यामुळे चिडलेल्या जमावाने तीन चारचाकी आण पाच दुचाकी पेटवून दिल्या. बऱयाच वेळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, रस्त्यावरून तब्बल चार ट्रॉली भरून दगड हटवण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.