
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात तिघांचा बळी गेला. त्यानंतर आज पुन्हा 24 परगणा येथे हिंसाचार उफाळून आला. वक्फ सुधारणा कायद्याविरोधात नागरिक प्रचंड आक्रमक झालेले दिसले. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या तसेच बसंती महामार्ग रोखून धरला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक उडाली. पोलिसांच्या दिशेने दगडफेकही झाली. त्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, सीपीआय आणि टीव्हीके या पक्षांनी वक्फ सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यालायात आव्हान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालय कायदे मंडळात हस्तक्षेप करणार नाही -रिजिजू
मला पूर्ण खात्री आहे, सर्वोच्च न्यायालय संसदीय कामकाजात किंवा कायदे मंडळात हस्तक्षेप करणार नाही, असे अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. जर उद्या सरकारने न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप केला तर ते चांगले दिसणार नाही, आम्हाला एकमेकांचा आदर राखावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल डझनभर याचिकांवर 16 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी रिजिजू यांनी अशाप्रकारे विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती नियंत्रणात; 19 कुटुंबे परतली
मुर्शिदाबादमध्ये 10 आणि 12 एप्रिल असे दोन दिवस हिंसाचार झाला. मात्र, आता तेथील परिस्थिती नियंत्रणात असून हिंसाचाराला घाबरून पळून गेलेली 19 कुटुंबे परतल्याचा दावा पोलिसांनी केला. लोकांनी परतावे यासाठी मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे.
आतापर्यंत 210 जणांना अटक
हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 210 जणांना अटक करण्यात आली आहे. पिता-पुत्राच्या हत्येप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून जे दोषी असतील त्यांना अजिबात सोडले जाणार नाही असे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद शमीम यांनी सांगितले. दरम्यान, पेंद्र सरकारने संवेदनशील ठिकाणी सुरक्षा दलाचे 1600 जवान तैनात केले असून अनेक ठिकाणी इंटरनेट बंद आहे तसेच भारतीय न्याय संहितेचे 163 कलमदेखील लागू आहे.