चुकीची माहिती दिल्याप्रकरणी, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार हे रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत तसेच पाण्यामुळेही झालेले नाहीत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेदरम्यान दिली होती. मात्र बोर्डीकर यांनी दिलेली माहिती ही चुकीची आहे, असे स्पष्ट करत काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे बोर्डीकर यांच्याविरोधात आज हक्कभंग सूचना दाखल केली.

बुलढाण्यातील शेगावमध्ये 18 गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात केसगळतीच्या घटना घडत होत्या. याप्रकरणी बोर्डीकर यांनी विधान परिषदेत प्रश्नाला उत्तर देताना रेशनवरील गव्हामुळे या घटना घडत नसल्याचे म्हटले होते, मात्र गव्हामध्ये असलेल्या सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याची बाब ‘पद्मश्री’ डॉ. हिंमतराव बाविस्कर यांच्या संशोधनात समोर आली. त्यामुळे चुकीची माहिती दिल्याचे सांगत काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी मेघना बोर्डीकरांविरोधात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे हक्कभंग सूचना
दाखल केली.