पैशाशिवाय भाजपकडे आता काही उरलेलं नाही; विनोद तावडे-‘बविआ’तील राड्यावरून पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप चांगलीच हादरली होती. त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजना आणून महिलांना 1500 रुपये दिले. परंतु, ही निवडणुकही त्यांच्या हातात येत नाही. जे लोकसभेला मुद्दे होते ते आताही आहेत. त्यामुळे भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे पैसे वाटपाचा, असा सणसणीत टोला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

विरार पूर्वेच्या विवांत हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना घेरले. विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप ‘बविआ’ने केला. मोठा राडा झाला. यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या सर्व घटनेवर पृथ्वीराज चव्हाण यांनी TV9 मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या मतदारसंघातही भाजपचा उमेदवार पैसे वाटताना सापडला. विनोद तावडेंसारखे दिल्लीतील भाजपचे ज्येष्ठ आणि राष्ट्रीय नेते अशा प्रकारे येऊन तिथे बसले असतील. तर या निवडणुकीत फक्त पैशांशिवाय भाजपकडे आता काही उरलेलं नाही. त्यांना एकही मुद्दा, जनतेचा प्रश्न सोडवता आलेला नाही. प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून हे सरकार चाललेलं आहे. प्रशासनाची पातळी इतकी खाली कधीही गेली नव्हती. याला राज्यातले नेते जितके जबाबदार आहेत तितकेच देशातले नेतेही जबाबदार आहेत, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

मुळातच एकनाथ शिंदे सरकार स्थापन झालं तेच पापात निर्माण झालं. 50-50 कोटींचा विषय झाला. आणि आता प्रत्येक ठिकाणी लोकं पैसे वाटताना सापडत आहेत. पैसे वाटल्याशिवाय आता त्यांच्याकडे दुसरा काही मार्ग राहिलेला नाही. महाराष्ट्राची जनता त्यांना चोख उत्तर देईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.