
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठल्यानंतर केवळ 100 ग्रॅम वजन अधिक भरल्याने हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र, ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न हुकलेल्या या प्रतिभावान खेळाडूला रौप्यपदक विजेत्या ऑलिम्पिकपटूप्रमाणे सन्मान देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला होता. त्या पाश्र्वभूमीवर विनेश फोगाटने तीन पर्यायांपैकी 4 कोटी रुपये घेण्याचा पर्याय निवडला.
विनेश फोगाटने, हरियाणाच्या क्रीडा खात्याला पत्र लिहून आपला निर्णय कळविला आहे. सध्या आमदार बनलेल्या विनेश फोगाटने गतवर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो गटाची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, फायनलपूर्वी झालेल्या वजन चाचणीत 100 ग्रॅम अधिक भरल्याने विनेशला स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यावेळी विनेशबद्दल देशभरात सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विनेश फोगाटला रौप्यपदकविजेत्या ऑलिम्पिक खेळाडूसारखा सन्मान दिला जाईल, अशी घोषणा केली होती.
त्यानंतर हरियाणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आली. भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धच्या आंदोलनातही विनेश फोगाट आघाडीवर होती. ती आमदार झाल्यामुळे भाजपच्या सैनी सरकारने तिला रौप्यपदकविजेत्या ऑलिम्पिकपटूचा सन्मान देण्यास टाळाटाळ केली.
याविरुद्ध विनेश फोगाटने अधिवेशनातच आवाज उठविला होता. यानंतर अखेर हरियाणातील भाजपच्या सैनी सरकारने मागील महिन्यात कॅबिनेटमध्ये विनेशचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिच्यापुढे रोख चार कोटी रुपये, क्लास वनची नोकरी किंवा एक फ्लॅट असे तीन पर्याय देऊन एका पर्यायाची निवड करण्यास सांगितले. विनेश स्वतः आमदार असल्याने ती नोकरीचा पर्याय स्विकारू शकत नव्हती. अखेर तिने चार कोटी रुपये घेण्याचा निर्णय घेतला आहे.