Vinesh Phogat Disqualified – विनेशला रौप्य पदक द्या, नियमांमध्ये बदल करा; अमेरिकेच्या कुस्तीपटूची मागणी

Paris Olympics 2024 मध्ये हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. देशभरातून क्रिडा प्रेमींचा पाठींबा विनेश फोगाटला मिळत आहे. त्याचे पडसाद आता जगभरात उमटताना दिसत आहेत. अमेरिकेचा स्टार कुस्तीपटू जॉर्डन बरोज विनेशसाठी मैदानात उतरला आहे. त्याने ट्वीट करून विनेशला रौप्य पदक देण्याची मोठी मागणी केली आहे.

ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आणि सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकवणाऱ्या अमेरिकेच्या जॉर्डन बरोज याने विनेश फोगाटला पाठिंबा दिला आहे. त्याने सोशल मीडिया माध्यम ट्वीटरवर (x) दोन ट्वीट करत विनेशला पाठिंब दर्शवत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने (UWW) आपल्या नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्याने पहिल्या ट्वीटमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाला काही सुचना केल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, 1) दुसऱ्या दिवशी 1 किलो वजन वाढले तर सुट मिळावी 2) वजनाचे मोजमाप सकाळी 8.30 एवजी 10.30 वाजता घ्यावे 3) भविष्यात फायनलमध्ये जर प्रतिस्पर्धी वजन कमी करण्यामध्ये अपयशी ठरत असेल, तर त्याला पराभूत घोषित करावे. 4) सेमीफायनलमध्ये विजयी झाल्यानंतर फायनलमध्ये गेलेल्या दोन्ही खेळाडूंचे पदक सुरक्षित असावे. वजनाची पुर्तता करण्यास खेळाडू चुकले तरी. ज्या खेळाडूचे वजन नियमात असेल त्याच खेळाडूला सुवर्णपदक दिले जावे,” असं जॉर्डनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटल आहे. म्हणजेच फायनलमध्ये गेल्या नंतर जो खेळाडू अपात्र ठरेल त्याला रौप्य आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला सुवर्ण पदक दिले जावे. तसेच जॉर्डनने अजून एक ट्वीट करत विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे.