आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू; विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत पी. टी. उषा यांची प्रतिक्रिया

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक दिली. मात्र, विनेश फोगाटला 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. तसेच ऑलम्पिकवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. या निर्णयाचे पडसाद संसदेतही उमटले. या निर्णयामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आता याबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पॅरिसमधल्या ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र ठरली. पन्नासपेक्षा जास्त वजन असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले आहे. याबाबत समजताच विनेशची तब्येत बिघडली आणि ती चक्कर येऊन पडली. डिहाड्रेशन म्हणजेच शरीरात पाणी कमी झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर पी.टी. उषा यांनी विनेशची भेट घेतली. तसेच याबाबत आम्ही आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आपण जागतिक कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनाही भेटणार असल्याचे उषा यांनी सांगितले.

विनेशने तिच्याकडून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तिने वजन कमी करण्यासाठी नाना प्रकार केले होते तरी विनेश अपात्र ठरली. विनेश 50 किलो वजनाच्या गटात कुस्ती लढत होती. वजन कमी करण्यासाठी विनेशने आधी केस कापले. तरी वजन कमी नाही झाले तरी विनेशने शरीरातलं रक्त काढलं. त्यानंतरही तिचे वजन जास्त भरले. याबाबत आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असेही उषा यांनी सांगितले.

विनेश फोगाटने 50किलो फ्रिस्टाईल गटात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक दिली, तिने 50 किलो गटाच्या उपांत्य लढतीत क्युबाची मल्ल युस्नेलिस गुझमान हिचा 5-0 गुण फरकाने मागे टाकत ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे एक पदक निश्चित केले. मात्र विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अपात्र ठरली आहे. तिचे वजन 100 ग्रॅम वाढल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियमानुसार वजन आटोक्यात असणे गरजेचे आहे. मात्र 100 ग्रॅमने वजन वाढल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले.