विनेश फोगाटचं वजन वाढलं कारण सरकारचं वजन घटलं! नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींना धोबीपछाड

हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरण्यात आल्याने विरोधी पक्षांनी संसदेत केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारला घेरले. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत धोबीपछाड दिली आहे. विनेश फोगाटसोबत राजकारण झाल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकारण खेळलं गेलं. विनेश फोगाट सुवर्णपदकाला गवसणी घलणार होती. ज्या प्रकारे तिला हटवलं गेलं ते पाहता तिथे खेळात राजकारण केलं गेलं, असे नाना पटोले म्हणाले. देशाचा दबाव तिथे कमी पडतोय. आपल्या देशाच्या नेतृत्वाचा जागतिक स्तरावर काय प्रभाव आहे? हे माहिती नाही. पण विनेश फोगाटला हटवलं हे देशासाठी वेदनादायी आहे, असे ते पुढे म्हणाले.

ट्विट करण्यापेक्षा विनेश फोगाटला खेळण्याची संधी मिळेल यासाठी योग्य त्या ठीकाणी बोललं पाहिजे, असा टोलाही नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून विनेश फोगाटचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली.