विनेश फोगाट अपात्रता प्रकरणावरून राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ; अध्यक्षांनी खुर्ची सोडली, विरोधकांचे ‘वॉकआऊट’

विनेश फोगाट हिला अंतिम सामन्याआधी वजन वाढल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले. यावरून देशभरात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना संसदेतही याचे पडसाद उमटले. राज्यसभेमध्ये या प्रकरणावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला. यामुळे अध्यक्ष जगदीप धनखड हे आपल्या खुर्चीवरून उठले.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी विनेश फोगाटच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यास परवानगी दिली नाही. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अध्यक्ष संतापले आणि ‘पुन्हा अशी कृती केल्यास तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल’ असा इशारा ओब्रायन यांना दिला. यामुळे काँग्रेस, टीएमसीसह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाचा त्याग केला.

असभ्य वर्तन करून सभागृहाची प्रतिष्ठा कमी करू नका. काही खासदार चुकीच्या टीका-टिप्पणी करतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या सभागृहाचे सदस्य आहेत. मात्र पत्र, वृत्तपत्र आणि मुलाखतींच्या माध्यमातून ते चुकीच्या टिप्पणी करत आहेत. ते मला आव्हान देत नसून अध्यक्षपदाला आव्हान देत आहेत, असे जगदीप धनखड म्हणाले. यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश हसल्याने याचाही धनखड यांनी समाचार घेतला आणि आपल्या खुर्चीवरून उठून चालू लागले.