
>> प्रा. विश्वास वसेकर
`विंदांचे गद्यरूप’ हा डॉ. सुधीर रसाळ यांचा विंदा करंदीकरांच्या वाङ्मय अभ्यासावर आधारित समीक्षा ग्रंथ. मराठीतल्या एका सैद्धांतिक भूमिकेवरचे हे पुस्तक. या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाला. यानिमित्त या ग्रंथाचे तपशीलवार विश्लेषण.
काही वर्षांपूर्वी डॉ. सुधीर रसाळ यांनी करंदीकरांच्या समग्र वाङ्मय अभ्यासाचा जणू एक प्रकल्प हाती घेतला आणि तो पूर्णत्वाला नेला. त्यातून त्यांच्या समीक्षेची दोन पुस्तके तयार झाली. त्यातले पहिले `विंदांचे गद्यरूप’ आणि दुसरे `विंदा करंदीकर यांची कविता’ (कवितायन). पैकी पहिल्या पुस्तकाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला आणि सबंध साहित्यविश्वाचे लक्ष या पुस्तकाकडे वेधले गेले.
डॉ. रसाळांनी दोन्ही प्रकारचे विपुल समीक्षा लेखन केले आहे. इथे प्रस्तुत असलेल्या `विंदांचे गद्यरूप’ या पुस्तकाचे दोन भाग असून पहिल्या भागात करंदीकरांच्या सैद्धांतिक समीक्षेचे आकलन आणि मूल्यमापन केले असून दुसऱया भागात करंदीकरांच्या ललित गद्याची मीमांसा केली आहे. विशिष्ट लेखकाच्या साहित्यकृतींचे विश्लेषण, अर्थनिर्णयन आणि मूल्यमापन करण्याच्या निमित्ताने साहित्याचे सिद्धांत अथवा साहित्यशास्त्राची तत्त्वे यांचे उपयोजन करून केली जाणारी समीक्षा ही उपयोजित समीक्षा मानली जाते. डॉ. रसाळांचा समग्र वाङ्मय अभ्यासाचा प्रकल्प हा उपयोजित समीक्षेचाच प्रकार आहे. या `विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथाचे थोडे तपशीलवार असे हे विश्लेषण.
करंदीकर इंग्रजीचे प्राध्यापक होते. पाश्चात्य काव्यशास्त्र, समीक्षा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. करंदीकरांची मराठी समीक्षा `परंपरा आणि नवता’ आणि `उद्गार’ या दोन पुस्तकांत एकवटली आहे. ललित साहित्यासंबंधीचे आपले सिद्धांत करंदीकरांनी मुळात इंग्रजीतून मांडले आहेत. करंदीकरांच्या इंग्रजीतील साहित्य विचारांचा आ. ना. पेडणेकर यांनी `साहित्य मूल्याची समीक्षा'(2004) या ग्रंथात अनुवाद केला आहे.
सामान्यत असे दिसून येते की, सर्जनशील लेखक जेव्हा समीक्षक बनतो तेव्हा त्यांनी मांडलेले मूल्यनिकष लावून फक्त त्याचेच ललित साहित्य श्रेष्ठ ठरते. उदा. पु. शि. रेगे, गंगाधर गाडगीळ, भालचंद्र नेमाडे. याला अपवाद मर्ढेकर आहेत. मर्ढेकरांची कविता जीवनवादी आहे. मात्र त्यांनी समीक्षेत कलाआकृतीवाद मांडला. करंदीकरांचे काहीसे असे झाले असले तरी तेवढय़ा कारणाने त्यांची समीक्षा खर्ची पडलेली नाही. उलट मर्ढेकरांनंतर मराठी समीक्षेला करंदीकरांनीच काही तरी नवीन दिले. याचा सूक्ष्म शोध डॉ. रसाळांनी प्रस्तुत ग्रंथात विस्ताराने घेतला आहे.
डॉ. रसाळांच्या अध्यापनासारखेच त्यांच्या समीक्षेचे हे वैशिष्ट्य आहे की, ते आपल्या विवेचनाच्या सुरुवातीला एखाद्याचे विचार इतक्या सुरेखपणे मांडून दाखवतात की त्या संबंधितालासुद्धा आपले विचार इतके स्पष्टपणे, निसंदिग्धपणे आणि पारदर्शीपणाने मांडता आले नसते. पहिल्या प्रकरणात करंदीकरांच्या वाङ्मय विचारांची चौकट आखून घेताना करंदीकरांनी उपयोजिलेल्या वाङ्मयीन संज्ञा (उदा. जाणीवनिष्ठा) रसाळांनी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत आणि वाचकांना विशद करून सांगितल्या आहेत. करंदीकर कोलरिजचा विचार आत्मसात करून कसा मांडतात हे सांगताना डॉ. रसाळ कोलरिजने केलेली कल्पनाशक्ती व्याख्या देतात – `सामग्रीला संश्लीष्ट स्वरूपाचा विशिष्ट आकार किंवा घाट प्राप्त करून देणारी शक्ती.’ अनेकत्वातून एकत्व शोधणे ही सर्वच कलांमध्ये घडणारी प्रक्रिया हीच संश्लेषण प्रक्रिया असते. पृ. 23 वर रसाळांनी केलेली `वाङ्मयकृतीत घाटाचे स्थान व कार्य’ ही चर्चा महत्त्वाची ठरते. करंदीकर घाट या संकल्पनेला पायावर चढवलेल्या मोजाचा दृष्टांत देतात याचा अर्थ वाङ्मयकृतीत घाट हा उपराच ठरतो. करंदीकरांच्या दृष्टांताची चेष्टा न करता रसाळ त्याच्या मर्यादा लक्षात आणून देतात. करंदीकर त्यांच्या काळात मराठी समीक्षेत स्थिरावलेल्या रूपवादाला धड टाळू शकले नाहीत ना धड स्वीकारू शकले, हे रसाळांचे मत पटण्यासारखे आहे.
दुसऱ्या प्रकरणात डॉ. रसाळांनी करंदीकरांच्या वास्तववादासंबंधीच्या भूमिकेचा परामर्श घेतला आहे. करंदीकरांनी वास्तववाद ही संज्ञा वापरली असली तरी तो रोमँटिसिझम किंवा क्लासिसिझमसारखा `वाङ्मयीन वाद’ नसून त्याचा `वास्तव’ एवढाच मर्यादित अर्थ आहे हे रसाळ स्पष्ट करतात. ललित साहित्य ही मूलतच वास्तववादी कला असते. म्हणून ते जेव्हा वास्तवापासून दूर जाते, तेव्हा त्याची कलात्मकता क्षीण होत जाते आणि जेव्हा ते वास्तववादाचा स्वीकार करते, तेव्हाच ते अभिजात कलाकृती या नामाभिधानास प्राप्त होते या विचारांचा परामर्श घेताना रसाळांनी वाङ्मयाने वास्तवसन्मुख होणे महत्त्वाचे असते असे म्हटले आहे.
काव्यनिर्मितीसंबंधीचा स्वतचा अनुभव हा करंदीकरांच्या समीक्षा लेखनाचा पाया आहे असे स्पष्टपणे रसाळ म्हणतात. त्यांचे समीक्षा लेखन हे स्वतच्या काव्यनिर्मितीचा व स्वतच्या काव्यस्वरूपाचा शोध घेण्यातून घडले आहे. ही त्यांच्या समीक्षा लेखनाची मोठीच मर्यादा आहे. ही मर्यादा त्यांच्या एकूण वाङ्मयस्वरूपविवेचनालाही लागू पडते.
चौथ्या प्रकरणात करंदीकरांच्या वाङ्मयाच्या निर्मितीमागे कोणता हेतू किंवा प्रयोजन असते या विषयीच्या समीक्षेचा विचार येतो. कोणत्याही गोष्टीचे (त्यात वाङ्मयही आले) प्रयोजन, त्याचे स्वरूप आणि त्याचे मूल्य या परस्पर निगडित घटकांचा एकत्रित विचार व्हायला पाहिजे. या परिप्रेक्ष्यातून रसाळ करंदीकरांच्या समीक्षेकडे पाहतात. रसाळांच्या मते करंदीकर ललित वाङ्मयाचा निर्मितीहेतूविचार एक `कला’ म्हणून करीत नाहीत, तर ती एक सामाजिक उपयुक्त वस्तू म्हणून करतात.
शेवटचे प्रकरण वाङ्मयाचे मूल्य आणि मूल्यमापनाचे निकष हे आहे. वाङ्मयकृती जीवनाचे किती समृद्ध अगर परिपूर्ण दर्शन घडवते, हे दर्शन बाह्य वास्तवाशी समांतर आहे काय, हे दर्शन वाचकाला जीवनपरिवर्तनासाठी कार्यप्रवृत्त करते काय, यावर वाङ्मयकृतीचे मूल्य अवलंबून असेल असे करंदीकरांचे म्हणणे आहे. रसाळांच्या मते वाङ्मयकृतीच्या घाटाबद्दल करंदीकर घेत असलेली भूमिका त्यांच्या मूल्य विचारात अडचण निर्माण करणारी आहे. वाङ्मयकृती आपल्या जीवनदर्शनाने वाचकमनात अस्वस्थतेची भावना निर्माण करते यालाही रसाळांचा आक्षेप आहे. रसाळ असा मुद्दा उपस्थित करतात की, जे वाङ्मय सुखदायक असून वाचकमनात प्रसन्नता निर्माण करते ते वाङ्मय जीवनदर्शी नसते काय? अर्थात डॉ. रसाळ हे मान्य करतात की, काव्यातले जीवनदर्शन एक अस्वस्थता निर्माण करते आणि या अस्वस्थतेमुळे हे जीवन बदलण्याची प्रेरणा मिळते.
शेवटचा मुद्दा हा आहे की, करंदीकरांचे साहित्य शास्त्राला किंवा सैद्धांतिक समीक्षेला योगदान काय? याचा विचार `उपसंहार’ या प्रकरणात केला आहे आणि तो पटण्यासारखाच आहे. ललित वाङ्मय ही ललित कला नसून ती जीवनदर्शी कला आहे हा नवा विचार करंदीकरांनी साहित्यशास्त्राला दिला. त्यांची संपूर्ण सैद्धांतिक समीक्षा या विचाराभोवती आहे. डॉ. सुधीर रसाळ यांनी लघुनिबंध, ललित लेख आदी संज्ञांची चर्चा केली आहे. वस्तुत 1950 च्या नंतर लघुनिबंध या वाङ्मय प्रकारात इतके मूलभूत आणि इष्ट परिवर्तन झाले की, चैतन्याने व जीवनरसाने ओतप्रोत भरलेल्या या प्रकाराला लघुनिबंध म्हणायची लाज वाटू लागली. असे फक्त या एकाच वाङ्मय प्रकारामध्ये मराठीत घडले. डॉ. रसाळ `ललित गद्याऐवजी `ललित लेख’ ही संज्ञा वापरतात. खरे पाहता महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रसिद्ध केलेल्या मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या खंड सातवा : भाग तिसरा (2010) मध्ये या वाङ्मय प्रकाराचा आढावा घेताना ललित गद्य हाच शब्द वापरला आहे. `मराठी साहित्य प्रेरणा व स्वरूप’ (1950-1975) या (1986) साली प्रसिद्ध झालेल्या नेमाडपंथीय डॉ. चंद्रशेखर जहागीरदार यांनी ललित गद्यावर अत्यंत पूर्वग्रहदूषित निबंध वाचला तरीही संपादकांनी या वाङ्मय प्रकारचे नाव ललित गद्य असेच ठेवले आहे. एकंदरीने असे म्हणायचे आहे की, `विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथात डॉ. रसाळ यांनी ललित गद्यासाठी `ललित लेख’ ही संज्ञा वापरण्याचा काहीसा अट्टहास केला आहे की काय?
या विवेचनाबद्दल माझे काही किरकोळ मतभेद आहेत. मला अतिशय आवडलेल्या `आम्रयोग’, `स्पर्शाची पालवी’ या ललित गद्याची त्यांनी उपेक्षाच केली आहे. `न आवडणाऱया गोष्टी’, `तरीपण बरे!’ हे दोन ललित गद्य सरांनी वाचलेले नाहीत. त्यातला `न आवडणाऱया गोष्टी’ हे ललित गद्य सरांना निश्चितपणे आवडले असते, परंतु त्यांच्या पुढे फक्त स्पर्शाची पालवी (1958) आणि आकाशाचा अर्थ (1965) या दोन संग्रहातले एकूण 49 सच निबंध आहेत. त्यानंतर अभिरुचीच्या जुलै 1949 च्या अंकात `तरी पण बरे!’ या शीर्षकाचे एक ललित गद्य प्रकाशित झाले होते, ते या दोहोंपैकी कोणत्याही संग्रहात अंतर्भूत झालेले नाही. `न आवडणाऱया गोष्टी’ या शीर्षकाचे आणखी एक ललित गद्य उपलब्ध आहे ते ही असंग्रहित आहे. म्हणजे रसाळ म्हणतात तसे करंदीकरांनी एकूण 49 ललित गद्य लिहिलेले नसून त्यांची एकूण संख्या 51 आहे.
डॉ. रसाळ यांच्या समीक्षेच्या प्रत्येक पुस्तकात काही कलाकृतींची सुंदर रसग्रहणे येतात. प्रस्तुत ग्रंथात हे भाग्य करंदीकरांच्या `तू वाहतो आहेस’ या ललित गद्याला लाभले आहे. पृष्ठ 124 ते 127 या पृष्ठांवरील हे रसग्रहण वेगळे काढून झेरॉक्स करून संग्रही बाळगावे इतके सुंदर आहे. ही रसाळांच्या करंदीकरांच्या ललित गद्य समीक्षेची एकमेव उपलब्धी म्हणता येईल. यानिमित्ताने आणखी एक सुचवावे वाटते, डॉ. सुधीर रसाळ यांच्या उपयोजित समीक्षा लेखांची ग्रंथालयशास्त्रानुसार एक विस्तृत सूची तयार होणे आवश्यक आहे.
स्वतला डॉ. सुधीर रसाळ यांच्या मानसवंशात जन्म घेतलेला त्यांचा विद्यार्थी मानतो. वाङ्मयाचे अध्यापन आणि समीक्षा कशी करावी हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. त्यामुळे मला त्यांच्या समीक्षेतील दोष किंवा उणिवा दिसतच नाहीत. माझ्या दृष्टीने आजही समीक्षक डॉ. सुधीर रसाळ `चंद्र मे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन’ असे समीक्षक आहेत. गुरुवर्यांना आता लवकरात लवकर ज्ञानपीठ मिळू दे ही प्रार्थना.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)