
सरकारचा निधी फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल, शिवसेना किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक रुपयाही मिळणार नाही, अशी धमकी देणारे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केले होते. त्याबद्दल शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नितेश राणे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी विनंती राज्यपालांना करण्यात येईल, असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.
अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिसीला पंधरा दिवसांत उत्तर द्यावे, असेही म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ येथे आयोजित भाजपच्या मेळाव्यात नितेश राणे यांनी धमकी देणारे वक्तव्य केले होते. नितेश राणे यांनी संविधानाच्या कलम 164(3) नुसार मंत्रीपदाची शपथ घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचे पालन करायला हवे ती संवैधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत, असा आरोप विनायक राऊत यांनी या नोटीसमध्ये केला आहे.