नवी दिल्लीतील एका बडय़ा उद्योगपतीने पंतप्रधान मोदींना मेल पाठवून ‘एमएसएमई’ खात्यातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले. त्यामुळेच मोदी यांनी नारायण राणे यांना पुन्हा मंत्री केले नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी केला.
कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात राणे कुटुंबीयांवर जोरदार हल्ला चढवला. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नाही, तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची सेनेतून हकालपट्टी केली असे सांगून राऊत म्हणाले, राणे हे कोकणातून धनुष्यबाण संपवायला निघाले होते; मात्र त्याच राणेंवर आणि त्यांच्या पुत्रावर आज धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत निलेश राणे यांचा राजकीय इतिहास संपवण्यासाठी वैभव नाईक यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार
सिंधुदुर्गातील विमानसेवा आपण सुरू केल्याचे श्रेय राणे घेतात; मात्र ही सेवा बंद का पडली आणि ती सुरू करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे मात्र ते सांगत नाहीत. जनतेनेही राणेंना याबद्दल जाब विचारला पाहिजे, असे राऊत म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 996 कोटी रुपये मंजूर झाले. मात्र, या निधीत बांधकाम खात्याने फार मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत, जिह्याचे पालकमंत्री आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.