मी श्रीमंत आहे, परंतु मला हे माहीत नाही की आयुष्यात आता काय करायचे आहे, माझ्यासमोर आता कोणतेही ध्येयच नाही, आयुष्यातून कुठल्याही प्रकारची संतुष्टी मिळाली नाही. मनःशांतीही मिळाली नाही. त्यामुळे आता हिमालयाची वाट धरत आहे… हे शब्द आहेत 8 हजार 400 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या 33 वर्षीय उद्योजक विनय हिरेमठ याचे.
इलिनॉय विद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत असतानाच स्टार्टअप सुरू करण्याच्या विचाराने विनयला झपाटले होते. दोन वर्षांनंतर त्याने इंडिनीयरिंग अर्धवट सोडून सोशल मीडिया स्टार्टअप बॅकप्लॅनसोबत जाण्याचा निर्णय घेतला.याच ठिकाणी विनयला थॉमस आणि शाहेद खान भेटले आणि तिघांनी लूम या टेक कंपनीचा पाया रचला.
विनयची कंपनी करते काय?
विनयची कंपनी लूम हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म यूजर्सना शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ बनवून ते शेअर करण्याची सुविधा देतो. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तब्बल दोन लाख व्यावसायिक आणि 1.4 कोटी यूजर्सना सेवा देत आहे. लूम या कंपनीला प्रचंड संघर्षही करावा लागला. दोन आठवडय़ांत ही कंपनी दिवाळखोरीत निघणार होती. कंपनी वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केल्याचे विनयने सांगितले.
– एका बडय़ा गुंतवणूकदाराला भेटलो आणि रोबोटिक्समध्ये काम केले, परंतु तिथेही मला प्रोत्साहन मिळू शकले नाही. सध्या भौतिकशास्त्र वाचतोय, पुढे शिकतोय. जेणेकरून भविष्यात आणखी मोठी कंपनी सुरू करू शकेन. कदाचित ही कंपनी लूम इतकी मोठी नसेल, परंतु आशा करतो की त्यातून मला संतुष्टी मिळेल.