नववर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार सामूहिक जलसमाधी आंदोलन, बस्स झाली ड्रामेबाजी? मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाचा तमाशाच सुरू आहे. वाल्मीक कराड शरण येतो, सीआयडीला सापडत नाही. तेवीस दिवस उलटून गेले तरी तीन आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. बस्स झाले हे नाटक. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत उर्वरित आरोपींना अटक न झाल्यास गावाजवळच्या तलावात जलसमाधी घेण्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तीन आठवडे उलटून गेले. वाल्मीक कराड शरण आला म्हणून सीआयडीने पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही. वाल्मीक कराड सापडला नाही हे त्यांचे अपयश आहे. दोन-चार दिवसांनी एक आरोपी सापडतो, नव्हे तर पोलिसांच्या हवाली करण्यात येतो. हे काय कायद्याचे राज्य आहे का? सगळे नाटक करताहेत. पण आता हे चालणार नाही. अजूनही तीन आरोपी मोकाट आहेत. वाल्मीक कराडला सहआरोपी करण्यासाठी कालच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

संतोष देशमुख यांचे ज्या गाडीतून अपहरण केले ती गाडी 10 डिसेंबरला सापडली आणि त्यातील मोबाईल 29 डिसेंबरला सापडले. जनतेला वेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे. एवढे दिवस या मोबाईलची तपासणी का करण्यात आली नाही? मोबाईल सापडूनही मुद्दाम त्याची माहिती दडवण्यात आली आणि त्यातील महत्त्वाची माहिती उडवण्यात आली, अशा अनेक शंका गावकऱ्यांनी उपस्थित केल्या आहेत.

सर्वांचे सीडीआर तपासून सगळ्या आरोपींना अटक करा. दोन-चार दिवसाला एक एक आरोपी अटक केला जात आहे. हे सर्व ठरवून चालले आहे. बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व आरोपी अटक न झाल्यास आम्ही 200 ग्रामस्थ जवळच असलेल्या तलावात जलसमाधी घेणार आहोत. जेणेकरून पोलिसांना आणि सरकारला आपल्या मनाप्रमाणे सर्व काही करता येईल. कोणी ओरडणारे नसेल, कोणी न्याय मागणारे नसेल, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

गुन्हेगार स्वतः सरेंडर झाला, पोलीस काय करत होते?

पोलीस यंत्रणा काम करत आहे हे मान्य आहे, पण गुन्हेगार स्वतः सरेंडर झाला, त्यांना अटक होत नाही. मग पोलीस काय करत आहेत, असा संतप्त सवाल स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने केला. या प्रकरणाशी संबंधित सगळ्यांचे सीडीआर तपासण्यात यावेत त्यानुसार आरोपींना अटक व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. सध्या तरी आरोपीच अटक होत नाहीत, न्याय कधी मिळणार, हा खरा प्रश्न असल्याची व्यथा तिने व्यक्त केली.

आरोपींसह नातलगांचीही बँक खाती गोठवणार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी सीआयडीच्या रडारवर आहेत. या आरोपींसह त्यांच्या नातेवाईकांची 13 बँकांमधील शंभरपेक्षा अधिक बँक खाती गोठवण्यात येणार असून, याबाबत सीआयडीच्या पथकाने न्यायालयाची परवानगी मागितली आहे. न्यायालयाने परवानगी देताच ही कारवाई करण्यात येणार आहे. केज पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेल्या एका महिलेचे बँक खाते गोठवण्यात आल्याने आरोपींच्या नातलगांचे धाबे दणाणले आहेत.