गाव करील ते राव काय करील! 58 वर्षे वाट पाहून कंटाळले, ग्रामस्थ क्राऊड फंडिंगमधून बांधताहेत पूल

‘गाव करील ते राव काय करील’ ही म्हण उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिह्याच्या एका गावातील ग्रामस्थांनी खरी करून दाखवलीय. तब्बल 58 वर्षे वाट पाहून आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाला कंटाळून कैमपूर गावच्या ग्रामस्थांनी क्राऊड फंडिंग करून नदीवर पूल बांधला. गावकरी गेल्या अनेक दशकांपासून सरकारी मदतीची वाट पाहत होते. अखेर निवृत्त लष्करी अभियंता रवींद्र यादव यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी पूल बांधणीला सुरुवात केली. पुलाच्या बांधणीत गावकरी निधी आणि श्रमदान करून आपले योगदान देत आहेत.

‘गावकऱ्यांच्या खर्चातून 108 फूट उंचीचा पूल आता मगाई नदीवर बांधला जात आहे. गावकरी सुमारे एक कोटी रुपयांचा आवश्यक निधी जमवत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी पुलाची मागणी वारंवार केली आहे, परंतु त्यांना फक्त आश्वासने मिळाली आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुलाची पायाभरणी करण्यात आली होती आणि आता काम जोरात सुरू आहे. गावकऱ्यांनी पूल बांधणीला सुरुवात केल्यानंतर जिल्हा प्रशासन पुलाच्या सुरक्षिततेची तपासणी करत आहे. ग्रामस्थांनी आणखी काही काळ वाट पाहायला हवी, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

रस्त्याअभावी रुग्णांची वाताहत

मगाई नदीच्या शेजारी वसलेल्या कैमपूर गावाला नाना संकटांचा सामना करावा लागतो. नदीच्या दोन्ही बाजूंना 70,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सुमारे 50 गावांना जिह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी 10 किमीपेक्षा कमी अंतर कापण्यासाठी 40 किमीचा वळसा घालून जावे लागते.

पावसाच्या दिवसांत नदी तुडुंब भरून वाहते. पुलाअभावी लोकांना खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी रुग्णांची वाताहत होते. खडतर प्रवासाचा मार्ग टाळण्यासाठी कैमपूर आणि 20 हून अधिक गावातील लोकांना दररोज बोटीतून जोखीम पत्करून नदीपलीकडे जावे लागते

जून 2022 मध्ये कैमपूर गावच्या तत्कालीन सरपंच शशीकला उपाध्याय यांनी नदीकाठी पूल बांधण्याचे काम सुरू केले. ‘मनरेगा’अंतर्गत हाती घेतलेला हा प्रकल्प प्रशासकीय अडचणींना तोंड देत मध्येच अडकून पडला.