जिंदाल कंपनी नांदिवडे-अंबुवाडीत उभारतेय गॅस टर्मिनल, ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ; 14 एप्रिल पासून बेमुदत धरणे आंदोलन

डिसेंबर महिन्यात झालेली वायुगळतीची घटना ताजी असतानाच जिंदाल कंपनी आता नांदिवडे अंबुवाडी फाट्यावर गॅस साठवणूक करण्यासाठी लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू असून गॅस टर्मिनलच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित व्हावे या मागणीसाठी प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडे 14 एप्रिल पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडणार आहे.

जिंदाल पोर्टमधून 12 डिसेंबर रोजी वायुगळती होऊन माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. त्यावेळीच ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत होते. ही घटना ताजी असतानाच जिंदाल कंपनी गॅस साठवण करण्यासाठी नांदिवडे अंबुवाडी येथे गॅस टर्मिनल उभारत आहे. या गॅस टर्मिनलविरोधात ग्रामस्थांनी दंड थोपटले आहेत. प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडेने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल पासून नांदिवडे येथे धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडेने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. या आंदोलनासाठी ॲड.असीम सरोदे, माजी मंत्री बच्चू कडू, ॲड.महेंद्र मांडवकर आणि ॲड.रोशन पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती सांगितले.