पाणीदार’ केंदूरचा अमेरिकेत बोलबाला! ग्रामस्थांनी एकीने बांधली जलसंधारणाची मोट; परदेशी पाहुण्यांची गावाला भेट

सतत दुष्काळाचे सावट असलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत ही परिस्थिती बदलण्याची वज्रमूठ बांधली. सरकारी वा अन्य कुठल्याही मदतीवर अवलंबून न राहता, गावकऱ्यांनी जलसंधारणाची कामे करीत गाव ‘पाणीदार’ केले. शिरूर तालुक्यातील केंदूरमधील या किमयेचा बोलबाला अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचला.

अनियमित पर्जन्यमान आणि जलस्रोतांचा अभाव यामुळे केंदूर गावातील ग्रामस्थांना कायमच दुष्काळाशी सामना करावा लागत होता. ही परिस्थिती बदलविण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत जलतज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलआरेखन केले. जलस्रोत, जलपुनर्भणाची ठिकाणे, जुने पाझर तलाव आदींची माहिती संकलित केली. या माहितीच्या आधारे जलआराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली. या कामामुळे गावातील पाणीसाठा वाढून गाव ‘पाणीदार’ झाले. या कामासाठी मूळचे केंदूरचे असलेले कोल्हापूरचे आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर, मुंबईचे अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे यांच्यासह गावातील अन्य उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. या ‘पाणीदार’ किमयेचा बोलबाला अमेरिकेपर्यंत पोहोचला.

अमेरिकेतील ‘वॉटर फॉर पीपल्स’ संस्थेचे सीईओ मार्क डुये यांनी गावाला भेट देऊन जलसंधारणाच्या कामाची पाहणी करीत ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने सरपंच प्रमोद फ्हाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.