लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाची गरज नाही. शहरातील तिन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लांडे यांनी सांगितले. त्यामुळे लांडे यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर लांडे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यांनी लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी मागितली. परंतु, पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली. तेव्हापासून लांडे नाराज होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वारंवार भेट घेण्यास सुरुवात केली. त्यांचे नातलग असलेले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात प्रवेश केला. लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेतला असून, ते आमच्यासोबत असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. मात्र लांडे यांनी सावध भूमिका घेतली.
विलास लांडे म्हणाले की, मागील दहा वर्षांत भोसरीत बकालपणा, दहशतवाद, दादागिरी वाढली आहे. हे मोडीत काढायचे आहे. त्यासाठी अजित गव्हाणे यांना मीच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात पाठविले होते. मला प्रवेश करण्याची आवश्यकता नाही. मी शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे. पवार यांनी माझ्याकडे पुणे जिल्ह्याची दिलेली जबाबदारी मी पार पाडणार आहे. मागील दहा वर्षांतील पराभवाचे उट्टे काढणार आहे. भोसरीला दहशत, दादागिरीमुक्त करणार आहे.
भोसरीतून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते. ग्रामदैवत भैरवनाथ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून कार्यकत्यांसोबत पदयात्रा सुरू केली. यावेळी तुतारीचा निनाद भोसरीच्या आसमंतात भरून गेला. भोसरी गावठाण भैरवनाथ मंदिर, समस्त गव्हाणे तालीम, समस्त फुगे माने तालीम, मारुती मंदिर व त्यानंतर भोसरी उड्डाणपूल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात आली. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार या सर्वांच्या विरोधात परिवर्तनाची लढाई सुरू आहे. पदयात्रेच्या निमित्ताने जमलेली गर्दी ही परिवर्तनाची नांदी ठरणार आहे, असे गव्हाणे यांनी सांगितले.
महायुतीत बंडखोरीचे पेव
चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांत महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, पिंपरीतून आरपीआयच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे.
महायुतीमध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आज अर्ज दाखल केला. माजी नगरसेवक नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाला आहे. आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा मतदारसंघ आरपीआयला मिळावा, अशी मागणी चंद्रकांता सोनकांबळे यांनी केली होती. मात्र, बनसोडे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या सोनकांबळे यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.