बॉलिवूड अभिनेता विक्रांत मॅसी याने सोमवारी तडकाफडकी अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली होती. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी त्याने ही घोषणा केल्याने विक्रांतच्या या निर्णयाने चाहते आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. त्याने एवढ्या तडाफडकी हा निर्णय का घेतला असावा? या निर्णयामागील कारण काय? या विचारात चाहते असताना विक्रांतने आता स्वत:च आपल्या पोस्टचा अर्थ सांगितला आहे.
विक्रांत मॅसी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली होती. नमस्कार, माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. मी अनेक वर्षांपासून माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे, परंतु आता मला वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्यायचे आहे. योग्य वेळ येईपर्यंत, येत्या 2025 मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचे भेटूयात. शेवटचे दोन चित्रपट आणि काही वर्षांच्या आठवणी सोबत घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा कायम ऋणी राहीन, असे विक्रांतने म्हटले होते.
View this post on Instagram
या पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले होते. विक्रांत याने एवढ्या कमी वयात इंडस्ट्रीला रामराम केल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र अवघ्या 24 तासांमध्ये यू टर्न घेत विक्रात याने आपल्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला असे म्हटले आहे.
ना मी निवृत्ती घेतलीय, ना मी इंडस्ट्रीला रामराम केला आहे. माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला फक्त एक ब्रेक हवा आहे, असे विक्रांतने म्हटले आहे. विक्रातने काही चित्रपट साईन केलेले असून त्याचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो ब्रेक घेणार आहे.
‘न्यूज 18’शी बोलताना विक्रांत म्हणाला की, मी निवृत्ती घेतलेली नाही. मला थोडी मोठी विश्रांती हवी आहे. मी कुटुंबियांना मिस करतोय, तब्येतही ठीक नाही. लोकांनी माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला.
विक्रांतचा अभिनय प्रवास
विक्रांतने 2007 मध्ये डिस्ने चॅनलच्या ‘धूम मचाओ धूम’ शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘धरम वीर’, ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’ आणि ‘बाबा ऐसा वर ढुंढो’ यांसारख्या शोमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. लुटेरा या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या 12 वी फेल या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेने त्याने थेट प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.