विक्रोळीतून सुनील राऊत यांची हॅट्ट्रिक, 15 हजार 526 मतांनी दणदणीत विजय

विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सुनील राऊत यांचा तब्बल 15 हजार 526 मतांनी विजय झाला. सलग तिसऱ्यांदा विजय मिळत त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. सुनील राऊत यांना एकूण 66,093 मते मिळाली. शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे यांचा दारुण पराभव झाला. सकाळी साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुनील राऊत यांनी आघाडी घेतली.

पाचव्या फेरीपासूनच विक्रोळीत ठिकठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाली. दहाव्या फेरीपासून ढोल, ताशे वाजण्यास सुरुवात झाली. पंधराव्या फेरीनंतर शिवसेनेचे गीत आणि ढोल-ताशे तसेच विजयी घोषणांनी संपूर्ण परिसर गजबजून गेला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘सुनील भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी शिवसैनिकांनी संपूर्ण विक्रोळी परिसर दणाणून सोडला.

हॅट्ट्रिक होणारच होती सुनील राऊत

विजयाची हॅट्ट्रिक तर होणारच होती, परंतु आज माझा विजय झाला असला तरी एका डोळय़ात आनंद तर दुसऱ्या डोळय़ात दुःखाचे अश्रू आहेत. महाविकास आघाडीचा कुटनीतीने पराभव करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या मतदारसंघात राज ठाकरेंनी तीन सभा, मुख्यमंत्र्यांनी तीन सभा घेतल्या. कोटय़वधी रुपये वाटले गेले. तरीही त्यावर मात करून मी विजयी झालो. केवळ माझ्या कार्यकर्त्यांमुळे, महिला आघाडीमुळे, त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे माझा विजय झाला. या विजयाचे श्रेय मी त्यांनाच देतो, अशा भावना सुनील राऊत यांनी व्यक्त केल्या.