
वक्फ सुधारणा कायद्याला विरोध म्हणून मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिलांना बसला. पीडितांच्या वेदना शब्दांत मांडता येणार नाहीत. हिंसाचाराचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच हा अहवाल केंद्र सरकारसमोर सादर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. आज कोलकाता येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मुर्शिदाबाद हिंसाचाराची झळ पोहोचलेल्या पीडित नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आवाहनही रहाटकर यांनी पश्चिम बंगाल सरकारला केले. हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिलांना बसला. त्यामुळे खासकरून महिलांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात आणी त्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. गेल्या दोन दिवसांत त्यांनी आणि समितीच्या इतर सदस्यांनी अनेक महिला, त्यांचे कुटुंब आणि मुलांची भेट घेतली. हिंसाचारामुळे झालेले नुकसान, वेदना याबाबत जाणून घेतले. त्यांना झालेल्या वेदना या शब्दांत सांगता येणार नाहीत. हिंसाचारामुळे त्यांच्या मनावर प्रचंड घाव झाले. त्यांच्या मनावरील जखमांवर माणुसकीच्या दृष्टीने फुंकर घालण्याचे आवाहन रहाटकर यांनी पश्चिम बंगाल सरकारला केले. हिंसाचारादरम्यान महिलांनी कुठल्या गोष्टींचा सामना केला ते सर्व अहवालात मांडण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या. हा अहवाल लवकरच केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक तसेच मुख्य सचिव यांना पाठवणार असल्याचे त्या म्हणाल्या.
फूट पाडण्याचा प्रयत्न
हिंसाचारावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला. जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करताना राज्यात भाजप आणि आरएसएसने दंगलीचा भयंकर कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आधी आरएसएसचे नाव घेतले नाही, परंतु आता नाव घेण्यास भाग पाडले जात आहे असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक
मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारादरम्यान पिता-पुत्राची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रमुख आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. बापलेकाच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. झियाउल शेख असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो सुलीतला पूर्वपारा या गावातील रहिवासी आहे.
अनेक भागांत असुरक्षित वातावरण
पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी, विशेषकरून मुर्शिदाबादमध्ये असुरक्षित वातावरण आहे. अनेक महिलांनी असुरक्षिततेची भावना व्यक्त केली. आपल्याला न्याय द्यावा आणि घर तसेच संपत्तीची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, एक महिला म्हणून पीडित महिलांच्या वेदना जाणून घेतल्यानंतर मी प्रचंड अस्वस्थ झाले, असेही रहाटकर म्हणाल्या. एका आईला चार दिवसांचे मूल घेऊन जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. नवविवाहित जोडप्याला घरातून पळ काढावा लागला. त्यांचे घर दंगलखोरांनी लुटले. मुर्शिदाबाद आणि मालदाच्या मदत शिबिरात आम्ही फिरलो, त्यांना मनसिकदृष्टय़ा खंबीर बनवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे सांत्वन केले, असे रहाटकर म्हणाल्या.
मुर्शिदाबाद हिंसाचार टीएमसी, भाजपचे कट कारस्थान- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
2026 च्या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसने मुर्शिदाबाद हिंसाचार घडवून आणला, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला असून याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. पक्षातर्फे शनिवारी ब्रिगेड परेड ग्राऊंड येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम बोलत होते. मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या आडून राज्यातील बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही सलीम यांनी केला.