अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू रामचंद्र यांच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील नयानगर या ठिकाणी दोन समाजात झालेल्या दगडफेकीची घटना गंभीर आहे. नयानगर येथील समाजकंटकांनी केलीली दगडफेक पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारी नाही. महाराष्ट्रातील सौहार्दाहचे वातावरण बिघडवणाऱ्या सरकारचे हे अपयश आहे. अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांवर कारवाई केली. या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी शांततेचे आवाहन करण्याची आवश्यकता असताना सत्ताधारी पक्षातील आमदाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य केली. इतकेच नाही तर मीरा रोड इथे जाऊन दहशत निर्माण केली. यामुळे तणाव निर्माण झाला. याला सरकार जबाबदार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारवर असताना सत्ताधारी आमदार जर जातीय दंगलीला चिथावणी देत असेल,तर हे योग्य नाही. सत्ताधारी आमदाराची ही वर्तणूक कायदाविरोधी आहे. सरकारचे अशा लोकप्रतिनिधींना अभय आहे का? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सर्व समाज गुण्या-गोविंदाने राहत असताना या समजात फूट पाडण्याचे कारस्थान सुरू आहे का?
लोकप्रतिनिधींनी समाजात सौहार्दाचे वातावरण ठेवले पाहिजे. पण महाराष्ट्रातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी समजात तेढ निर्माण करत आहेत. ही बाब निषेधार्ह आहे. सरकारने तात्काळ याची दखल घ्यावी आणि आपल्या पक्षातील आमदार आणि नेत्यांना ताकीद द्यावी, असे वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहे.