हा तर सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न; विजय वडेट्टीवार यांनी मिंधे सरकारची पिसं काढली

विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तिजोरीत खडखडात असतानाही योजनांची खैरात वाटणाऱ्या मिंधे सरकारची विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पिसं काढली. महागाई वाढवून लूटणाऱ्या सरकारला लाडली बहीण योजनेच्या नावाखाली मतं मिळणार नाहीत. दीड हजार रुपये देण्यापेक्षा महागाई कमी करा असे पत्र एका बहिणीने मुख्यमंत्र्यांना पाठवले असून निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यांसाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

सरकारी पैशातून मतं खरेदी करण्याचा हा प्रयत्न जनतेने ओळखला आहे. शासकीय निधीतून मतं खरेदी करण्याचा हा प्रयत्न केवीलवाना आहे, असे म्हणत दोन वर्षांपूर्वी सरकार आल्यावर ही सदबुद्धी का सुचली नाही? निवडणुकीच्या तोंडावरच का सुचले? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्ल्याने गेलेली पत सांभळण्यासाठी हा केवीलवाना प्रयत्न असून त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असेही ते म्हणाले.

पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी मराठवाड्यातील डीपी चोरीचा प्रश्नही विधिमंडळात उपस्थित करणार असल्याची माहिती दिली. परभणी, हिंगोली, नांदेड आणि विशेषत: जालना या भागातून वर्षभरात शेतकऱ्यांच्या साडे तीनशे डीपी जोरीला गेल्या. याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे. हे अधिकारी आणि चोरांचे रॅकेट असून चोरी करायची, परत कारखान्याला द्यायचे आणि पुन्हा त्याच डीपीसाठी शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपये घ्यायचे, असा आरोप करत गृहखाते काय करत आहे? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. हा प्रकार गंभीर असून याकडे, कायदा व सुव्यवस्थेकडे सरकारचे लक्ष नाही. सरकारचे लक्ष फक्त टेंडरबाजी आणि कमीशनखोरीवर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांची फसवणूक

कृषीमंत्री धनंजन मुंडे विधिमंडळात उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आम्ही शेतकऱ्यांना 15 हजार कोटी दिल्याचे ते म्हणाले. पण सरकारने फक्त जीआर काढला, पैसे दिले नाही. दोन वर्षात फक्त 4600 कोटी रुपये दिले. ही बनवानबवी असून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. अशीच फसवणूक पिकविम्यात झाली असून जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि काढून घ्यायचे. हे मोठे रॅकेट असून त्यांची सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील

दरम्यान, विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तीन उमेदवार रिंगणात उतरवले असून तिन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.