सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे वडेट्टीवार यांनी राही सरनोबत आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ते बोलत होते.
सुवर्णपदक विजेती राही सरनोबत शासकीय सेवेत असली तरी कामावर रुजू झाल्यापासून तिला वेतन मिळत नाही. तर दुसरीकडे शहीद मेजर अनुज सुद यांच्या कुटुंबियांना मदतीपासून डावलले जात आहे. जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा इथे दहशतवाद्यांशी लढताना 2 जुलै 2020 रोजी सूद शहीद झाले. त्यावेळेस त्यांचे वय 30 वर्ष होते. 2005 मध्ये कुटुंबीयांसह पुण्यात वास्तव्यास होते. शहीद सैनिकांच्या कुटुंबांना राज्यसरकारकडून मिळणारे भत्ते आणि लाभ सुद यांच्या पत्नीला नाकारण्यात आले आहेत.
सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या राहीला वेतन मिळत नाही आणि विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला 11 कोटी रुपये द्यायला विशेष बाब म्हणून सवलत मिळते. शहीद सुद यांच्या बाबतीत सरकारच्या धोरणाबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि न्यायालयाने विशेष बाब म्हणून या प्रकरणाकडे सरकारने बघावे अशी नोंद केली तरीही शिंदे सरकारने धोरणात्मक निर्णयाचे कारण देत टाळाटाळ केली.
कोर्टाच्या निर्देशानंतरही शहीद सूदच्या कुटुंबाला वणवण भटकावे लागत आहे. तिजोरी खाली असताना अकरा कोटी रुपये खिरापत वाटली तसे यांना फार लागणार नाही. त्यामुळे नेमबाज राही सरनोबतला वेतन देण्यात यावे व शहीद सूदच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी केली.