हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आता महाराष्ट्रातही पहिलीपासून मराठी-इंग्रजीसोबत हिंदीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवावे लागणार आहेत. यालाच विरोध करत वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे.

एका आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “संघराज्य निर्मितीच्या वेळी भाषेला प्राधान्य देताना राज्यांची मातृभाषा मान्य केली गेली. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असून, इंग्रजीसह या दोन भाषा शिक्षण व प्रशासनात वापरल्या जातात. अशा परिस्थितीत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय आहे, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला आहे.”

ते म्हणाले की, “जर तिसरी भाषा हवीच असेल, तर ती पर्यायी असावी. पण ती सक्तीची करणे हा एकप्रकारे केंद्रातून राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, जो संघराज्य व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना धरून नाही. काही राज्यांनी याला विरोध केला आहे आणि त्यांना धमकावले जात आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. मराठी अस्मिता आणि भाषिक अधिकार रक्षणासाठी ही सक्ती तात्काळ मागे घेतली पाहिजे.”