एकनाथ शिंदे यांची महायुतीत परिस्थिती बिकट, शिंदेंना संपवून नवीन ‘ उदय ‘ पुढे येण्याची शक्यता; विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

पालकमंत्रीपदाच्या यादीतील दोन मंत्र्यांना नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्रीवदावरुन महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महायुती सरकार मधील नाराजी नाट्य संपत नसल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून आपल्या गावी गेले आहेत. शिंदे यांची गरज भाजपसाठी संपली आहे का? उध्दव ठाकरे यांचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना आणले तसे शिंदे गटात नवीन ‘ उदय ‘ पुढे येईल असे सूचक विधान काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. पालकमंत्री पदावरून शिवसेनेत नाराजी आहे अश्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे पदरात काही पडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वडेट्टीवार म्हणाले.

नागपूर इथे  काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाच्या स्थगितीवरुन सरकारवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र तरी देखील या सरकारमध्ये धुसफुस सुरूच आहे. आधी मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर पालकमंत्री नेमण्यात आणि आता नेमलेले पालकमंत्री या आदेशाला 24 तासात स्थगिती देण्याची वेळ आली आहे.  यावरून या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, आज पालकमंत्री बदलतील, उद्या मंत्री, उपमुख्यमंत्री बदलतील..ही परिस्थिती पाहून जनतेलाच या सरकारला स्थगिती द्यावी लागेल, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. या तिन्ही पक्षांमध्ये जिल्ह्याच्या विकासापेक्षा जिल्ह्यात मलिदा कोण खाणार याची स्पर्धा लागली आहे, यातूनच नाराजी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, लाडक्या बहिणीचे लाभार्थी कमी केले जात आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार याकडे सरकारचे लक्ष नाहीए. फक्त एकमेकांत वाद घालून महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचे काम हे महायुती सरकार करत आहे, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केली.