निवडणुकीत गुलाबी जॅकेट घालून फिरणारे, सत्ता आल्यावर जॅकेटप्रमाणे लाडक्या बहिणीना विसरले – विजय वडेट्टीवार

ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला. निवडणुकी आधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी जॅकेट ही विसरले आणि लाडक्या बहिणींना विसरले अशी टीका काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. पण या बजेट मध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही, लाडक्या बहिणींचा उल्लेख ही भाषणात नाही. एकीकडे लाडकी बहिण योजनेत वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र केले जात आहे दुसरीकडे निधी वाढवून दिला नाही यावरून तिजोरीत खडखडाट असल्याचे स्पष्ट आहे असे विधी मंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांशी देखील सरकारने गद्दारी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीत दिले होते पण आज अर्थसंकल्पाच्या भाषणात बळीराजाच्या पदरी निराशा आली आहे ,त्यामुळे महायुती सरकार क्या हुआ तेरा वादा? बँका आता शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही याला कोण जबाबदार असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे येथील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाना भरघोस निधी देण्यात आला, उरलेला निधी नागपूर येथील प्रकल्पाना देण्यात आला. पण ग्रामीण भागातील योजना, प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आले. शहरी भागातील प्रकल्प म्हणजे कंत्राटदारांसाठी हे बजेट आहे का? दलित, वंचित, आदिवासी सर्वसामान्यांचा विसर या सरकारला पडल्याची टीका विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आज अर्थसंकल्प झाल्यावर महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर महायुती सरकार विरोधात आंदोलन केले. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ,निधीचा मात्र दुष्काळ आणि सरकारची जुमलेबाजी या अर्थसंकल्पातून दिसली, असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.