अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही देण्यात आलेले नाही. त्यावरून काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? असा सवाल वडेट्टीवार यांनी ट्विट करत केला आहे.
”बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेट मध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजप सरकारला पाठिंबा देखील दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाला -ठेंगा! देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये पळवणार आणि बजेट मध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली तर गुजरात किंवा इतर राज्य… महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल!,असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे.