कर्जमाफीची घोषणा करताना मोदी शहांची परवानगी घेतली का? विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांना टोला

मुल बल्लारपूर मतदारसंघात शहरातील जयभीम चौक (टेकडी) आणि दुर्गापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्यासाठी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या खोट्या घोषणा आणि आश्वासनांवरून टीका केली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर केलेल्या शेतकऱ्यांच्या घोषणेवरूनही टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणीवासींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चंद्रपूरात घोषणा केली. यावेळी त्यांनी महायुती सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, अशी घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करताना फडणवीस यांनी मोदी -शहा यांची परवानगी घेतली का? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना टोला लगावला. अमित शहा यांनी, आम्ही कर्जमाफीच्या विरोधात आहोत, असे आधीच जाहीर केले. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा करताना आधी त्यांची परवानगी घेतली का, हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजप खोटारड्यांचा पक्ष आहे, तेलंगणात बहिणीसाठी प्रतिमाह 2500 रूपये ही योजना बंद केल्याचे धादांत खोटं भाजप पसरवत आहे. तेलंगणा असो की कर्नाटक या राज्यात योजना अजूनही सुरु आहे. तुम्ही विकास म्हणता मग रोजगारासाठी येथील कामगार परराज्यात का जातात? महिला अत्याचार रोखण्यात शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची महाभ्रष्ट युती सपेशल अपयशी ठरली आहे, असा हल्लाबोलही विजय वडेट्टीवार यांनी केला.